अलिबाग : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गुढीपाडव्याला जिल्ह्यात कुठेही नववर्षाच्या स्वागतयात्रा निघाल्या नाहीत. यावेळी घरोघरी सुख-समृद्धीची व निरोगी आयुष्याची गुढी उभारल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यंदाच्या शुभेच्छा संदेशात ‘कोरोनाचे जगावरचे संकट टळू दे’ अशा आशयाचे संदेश झळकत होते.साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणून गुढीपाडव्याला खूपच महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवोपक्रमांचा प्रारंभ, सुवर्णखरेदी, इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. जिल्ह्यातील गावागावांत पहाटेपासून या उत्सवाची धामधुम सुरू राहते.पहाटेचे स्नान आटोपले की, आपला परंपरागत मराठमोळा पेहराव घातला जातो. पुरुष मंडळी प्रवेशद्वारावर तोरण बांधून बांबूच्या झाडाची काठी दरवाजात उभारतात; तर महिलावर्ग देव्हाऱ्यात पूजेची तयारी तर अन्य महिला गोडधोड बनविण्याच्या कामी स्वयंपाकघराचा ताबा घेतात. अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात, सुमधुर संगीताच्या किंवा भक्तिगीतांच्या आवाजात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या वर्षी ठिकठिकाणी निरुत्साह दिसून आला.जिल्ह्यातील १५ तालुक्यांत स्वागतयात्रेच्या आयोजनादरम्यान ढोलताशांच्या गजरात मोठ्या मिरवणुका काढल्या जायच्या; मात्र संपूर्ण जगाला हादरविणाऱ्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे या वर्षी समस्त हिंदू धर्मीयांना घरातच लॉकडाऊन व्हायची वेळ उद्भवली. बाजारपेठा बंद करण्यात आल्याने महिलांना कोणतीही खरेदी करता आली नसल्यामुळे हिरमोड झाल्याचे क्रांती पाटील यांनी सांगितले. घरात रांगोळी काढून देवाची पूजा करीत ‘कोरोनाचे जगावरचे संकट टळू दे आणि नववर्ष निरोगी आयुष्याचे जाऊ दे’ अशी प्रार्थना या वेळी परमेश्वराकडे करण्यात आली.
गुढीपाडवा साधेपणातनागोठणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आज चैत्र महिन्याचा वर्षारंभ अर्थात गुढीपाडव्याचा सण साधेपणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहराच्या विविध भागात घरोघरी गुढी उभारण्यात आली होती. शासनाच्या निर्बंधानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच ठेवण्यात आली असल्याने बाजारपेठेत तुरळक ग्राहक होते.
मुरुडमध्ये गुढीपाडवा उत्साहातमुरुड : गुढीपाडव्यानिमित्त मुख्य बाजारात असंख्य लोकांनी फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. फुले, आंब्याची पाने, कडुलिंबाची पाने विकत घेण्यावर लोकांनी अधिक भर दिला. तसेच मिठाईच्या दुकानातून आम्रखंड व श्रीखंड घेण्यासाठी गर्दी झाली होती. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छासुद्धा देत होते. मुरुड शहरात तसेच ग्रामीण भागात घरासमोर गुढी उभारण्यात आल्या होत्या. मोठ्या मंगलमय वातावरणात हा सण साजरा करण्यात आला.