नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 06:12 PM2022-12-06T18:12:40+5:302022-12-06T18:13:00+5:30
चिरनेर येथील अजय मोकल या चित्रकारांने चितारलेल्या चित्रांचाही समावेश
मधुकर ठाकूर
उरण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथील नामवंत अशा १५ चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार कलार्पण या शीर्षकांतर्गत मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ६ ते १२ डिसेंबर दरम्यान पाहावयास मिळणार आहे. यामध्ये चिरनेर गावातील अजय मोकल या चित्रकारांनी चितारलेल्या चित्रांचाही समावेश आहे.
या सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (६) डिसेंबर रोजी उद्योगपती विलास गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कला क्षेत्रातील अनेक जाणकार मान्यवर मंडळी उपस्थित होती. कलार्पण या भव्य कला प्रदर्शनात जितेंद्र गायकवाड, पुरेंद्र देवगिरीकर, शोभा भावसार, नितेश जाधव, पार्थ पाटील,अजिंक्य भगत, अनिकेत खाडे,अनिल चौधरी, सुनील देशमुख,अजय मोकल, स्वराज वांद्रे,प्रतीक भोसले, ओंकार पिलोळकर, मुक्ता कुलकर्णी, विठ्ठल पाटील या १५ चित्रकारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने जलरंग, तैलरंग वापरून साकारलेल्या वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार रसिकांना पाहायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.