अलिबाग : पीओपी हे पर्यावरणपूरक आहे, असे शास्त्रज्ञ म्हणत असताना मुंबई पालिकेने नवीन नियमावलीद्वारे अशा मूर्ती तयार करून विसर्जित करण्यास बंदी घातली आहे. याविरोधात मूर्तिकार आंदोलन छेडणार असल्याचे राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पेण हे गणपतीचे माहेरघर आहे. लाखो गणेशमूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात. गणेशमूर्ती व्यवसायातून काेट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते. या व्यवसायावर हजारो जणांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशात पीओपी मूर्ती विसर्जित करण्यास बंदी घातल्याने मूर्तीकारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे मूर्तिकारांनी सांगितले.
मूर्तिकांराना फटकाउच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई पालिकेने पीओपी मूर्तींवर बंदीचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका अशा गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना बसला आहे. त्यामुळे पेण येथे शुक्रवारी राज्यातील गणेश मूर्तिकार व्यावसायिक एकत्र आले होते. मात्र, न्यायालयाने पीओपीवर बंदी घातली असून, हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे मूर्तिकार कसा तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे.
पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे मूर्तिकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पीओपी हे पर्यावरणाला घातक नाही, असे शास्त्रज्ञ म्हणत आहेत. त्यामुळे आंदोलन करणार आहोत. मूर्ती व्यावसायिकांशी सरकारने संवाद साधणे आवश्यक आहे. अभय म्हात्रे, अध्यक्ष, राज्य मूर्तिकार संघटना
पीओपी पर्यावरणाला घातक नाही. याचे तपासणी अहवाल आमच्याकडे आहेत. न्यायालयाने पीओपीसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगूनही शासनाने तीन वर्षे तो दिला नाही. शासनाने मूर्तिकरांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. कुणाल पाटील, मूर्तिकार, हमरापूर, पेण