पैठणमध्ये विहिरीवर कोसळली दरड
By admin | Published: July 6, 2016 02:29 AM2016-07-06T02:29:05+5:302016-07-06T02:29:05+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी
पोलादपूर : तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
गेले आठ दिवस जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळी पैठण येथे दरड कोसळून थेट विहिरीच्या भिंतीवर पडली. यामुळे विहिरीच्या भिंतीचा अर्धा भाग कोसळला आहे. ही विहीर २० वर्षांपूर्वीचा असून नळपाणी योजना कोलमडली किंवा अन्य कारणाने बंद पडली तर पैठण ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे हे एकमेव स्रोत म्हणून या विहिरीचा उपयोग होतो. विशेष म्हणजे या विहिरीला बारमाही पाणी असते. अगदी मे महिन्यात सुद्धा पाणीटंचाई जाणवत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या विहिरीची डागडुजी शासनाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेनंतर ग्रामसेवक, सरपंच किशोर मोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या विहिरीसाठी सुमारे ४ ते ५ लाख खर्च येईल असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा खर्च ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संतोष मोरे यांनी केली आहे.
पावसाचा फटका
गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पोलादपूर तालुक्यात पाऊस पडत आहे. यामुळे चार दिवसांपूर्वी पळचील सावरीचीवाडी येथे विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता तर सोमवारी भोगाव पार्टेवाडी येथे गुरांचा गोठा कोसळून एका गायीचा मृत्यू झाला तर बैल जखमी झाल्याची घटना घडली.