पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 07:02 AM2018-09-27T07:02:40+5:302018-09-27T07:02:53+5:30

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे.

 Pali Dhanagarwada is shining, first power reached after Independence | पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

Next

- कांता हाबळे
नेरळ - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळे आता तरुणांना शिक्षण, आरोग्य आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी या वीजपुरवठ्याचा पुरेपूर उपयोग होणार असल्याचे येथील नागरिक रामा खरात यांनी सांगितले. त्यामुळे तेथील धनगर बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला.
२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत विद्युतपुरवठा नियमित करण्यात आला. याठिकाणी ६३ के व्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून सिंगल फेज लाइन खेचण्यासाठी एसटी लाइनचे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसविण्यात आली. या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या या पाली धनगरवाड्याचे पाली गावापासूनचे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या तीस ते चाळीसच्या आसपास असून येथे धनगर बांधवांची सात घरे आहेत. पूर्व परंपरागत दुग्ध व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
देश स्वतंत्र झाल्यापासून येथे वीजच पोहोचली नसल्याने त्यांचा सर्वांगीण विकासच खुंटला होता. आता मात्र येथे वीजपुरवठा कायमस्वरूपी होणार आहे. त्यामुळे गावाच्या सर्र्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या धनगरवाड्यामध्ये प्रथमच विद्युतपुरवठा सुरू होत असल्याने येथील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही ते वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- ए. ई. घुले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कर्जत

येथे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसवली. त्याचे उद्घाटन सेना उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title:  Pali Dhanagarwada is shining, first power reached after Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.