पाली : सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पालीची ओळख आहे. हे गाव आता नगरपंचायतीचे नाव धारण करून शहर बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र आजही येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अंधारात आहे. जवळपास एक किमी अंतर असलेल्या या रस्त्यावर निम्मे अंतरापर्यंत विजेचे खांब आहेत. परंतु लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्ययात्रेसाठी जाताना व स्मशानभूमीच्या प्रेताग्नीच्या ठिकाणी आजही पेट्रोमॅक्स, बॅटरी आणि मोबाइल फ्लॅशच्या उजेडाचा आधार घ्यावा लागत आहे.पाली शहराची लोकसंख्या जवळपास दहा ते अकरा हजार आहे. शहरात तीन ते चार स्मशानभूमी आहेत. यापैकी पाली एसटी स्टॅन्ड, अंबा नदीच्या तीरावर असलेल्या या स्मशानभूमीचे बांधकाम, घाट आणि परिसराची स्वच्छता तसेच ग्रामपंचायतीमार्फत विजेचे मीटर आणि लाईटची सोय करण्यात आली होती. उत्कृष्ट स्मशानभूमी म्हणून बांधकाम झालेल्या या स्मशानभूमीला माणगाव येथील माजी आमदार अशोक साबळे यांनी भेट देऊन या प्रकारचे बांधकाम करावे, अशा सूचना अधिकारीवर्गाला दिल्या होत्या, अशी माहिती माजी सरपंच राजेश मपारा यांनी दिली. मात्र या स्मशानभूमीची नासधूस झाल्यानंतर या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अंधाराची परिस्थिती आहे. रात्रीच्या वेळी मयताला येथे आणताना नागरिकांची गैरसोय होत आहे, असे मपारा यांनी सांगितले.
पाली स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2015 11:42 PM