पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:13 AM2018-06-27T02:13:06+5:302018-06-27T02:13:14+5:30

मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती.

The Pali-Khopoli road is restored in only 12 hours | पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

googlenewsNext

जयंत धुळप
अलिबाग : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आणि बांधकाम विभागाच्या समन्वयाने अवघ्या बारा तासांत युध्दपातळीवर काम करून हा पूल बांधण्यात आल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.
रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे पाली - खोपोली रस्त्यावरील खुरावले फाट्याजवळील पूल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वाहुन गेला. अपघात रोखण्यासाठी पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वाहतूक बंद केली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी जड वाहने वाकण फाट्यावरून पेण मार्गे वळविली, तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली.
जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच ५४८-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या निम्म्याभागाचे काम सुरु होते व जुन्या निम्म्या भागावरून रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेला छोटा पूल (पाइप मोरी) संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहून गेली. त्यावेळी पालीचे तहसीलदार बी.एन. निंबाळकर पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेत व्यस्त होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आली.
लगेचच रायगड पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्वांचा समन्वय ३० मिनिटांत साधण्यात आला. घटनास्थळी निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.

दीड तासात पुलाच्या उभारणीचे काम सुरू
दोन हायड्रा मशिन्स, दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्डच्या मदतीने सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पुलाच्या उभारणीस सुरु वात करण्यात आली. पुलाचे जुने पाइप ६०० मिमीचे होते. ते हटवून त्या ठिकाणी १२०० मिमीचे सिमेंट पाइप टाकणे आवश्यक होते. तेथून जवळच जांभूळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाइप आणले.
रस्त्याचा भराव मोकळा करून पाइप टाकण्यासाठी जागा तयार करून पाइप टाकण्यात आले. रस्त्यावरून रहदारी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्र अद्याप सुरु केलेली नाही. अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या निम्म्या भागाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर त्यावरु न रहदारी वळवून उर्वरित भागाचे काम पुन्हा करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली आहे.

Web Title: The Pali-Khopoli road is restored in only 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.