पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:38 AM2018-12-10T00:38:33+5:302018-12-10T00:38:50+5:30

रुंदीकरणाचा मूळ रस्त्याला फटका; स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Pali - neglected by Khopoli road; Poths, dusty empires | पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

googlenewsNext

- विनोद भोईर 

पाली : पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रुंदीकरण करताना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर निघाल्याने खडी बाहेर आली आहे. या खडीवरून दुचाकी, चारचाकी वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. रुंदीकरणापूर्वी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे परिसरातील नागरिक तसेच चालकांचे म्हणणे आहे.

रुंदीकरणामुळे साइडपट्टी तोडण्यात आल्या आहेत. शिवाय मातीचा भराव टाकल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्त्यावर मातीचा धुरळा उडतो. चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराने वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास पाली व्यापारी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक ओसवाल यांनी दिली आहे.

पाली-खोपोली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात जोमात सुरू होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद होते. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, महामार्गाचे काम सुरु करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा असे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रुंदीकरणावर भर देत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पाली ते खोपोली फाटा हा साधारण पस्तीस किमीच्या रस्त्यात काही ठिकाणी रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. यात ज्या रस्त्यावरील भाग काँक्रीटचा झाला आहे त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु काँक्रीटचा रस्ता सुरू होतो, त्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहने आदळतात. वाहने आदळू नये म्हणून चालक अचानक ब्रेक दाबत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पाली-खोपोली रस्त्याचे काम आता वेगाने सुरू होईल, अशी शक्यता आहे.

काम संथगतीने चालकांमध्ये नाराजी
वर्दळीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाली-खोपोली महामार्गावरून मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तहसीलदार तसेच उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे जाणे - येणे असते. परंतु या त्रासाबद्दल कोणीच काही बोलत नाही.
पालकमंत्र्यांनी रस्त्याची पाहणी करून रुंदीकरणाच्या कामापेक्षा अगोदर वाहतुकीचा रस्ता सुरळीत करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत, अशी मागणी होत आहे.
रुंदीकरणापेक्षा पीडब्ल्यूडीच्या ताब्यात असलेला रस्ताच बरा होता अशी प्रतिक्रि या आता लोकांमधून येत आहे. हे काम असेच संथ गतीने सुरु राहिले तर पुढील पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीयोग्य राहणार नाही.

पाली-खोपोली मार्गावरील जो रस्ता अजून रुंदीकरणासाठी घेतलेला नाही, तेथे मूळ डांबरी रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना गाडी चालवताना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
दुपदरी रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होणार असला तरी जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता हा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गावर ज्या ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी मातीचा भराव घातला असून वाहनांमुळे धुराळा उडत आहे. यामुळे या भागातील अनेक जणांना त्वचा रोग आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे.

Web Title: Pali - neglected by Khopoli road; Poths, dusty empires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.