पाली तालुक्यात सिद्धेश्वर गावातील तलावाचा गाळ काढण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:18 AM2018-05-25T04:18:49+5:302018-05-25T04:18:49+5:30
जेसीपी आणि एका डंपरच्या साहाय्याने हे गाळ काढण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांनी दिली
अलिबाग : ‘गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पाली तालुक्यातील उद्धर या पहिल्या तलावानंतर बुधवारी सिद्धेश्वर बु. गावच्या तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या शेतात तलावातील गाळ घेऊन जाण्याकरिता पाच ते सहा ट्रक्टर्स घेऊन शेतकरी या वेळी उपस्थित होते. जेसीपी आणि एका डंपरच्या साहाय्याने हे गाळ काढण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांनी दिली आहे.
पाली तालुक्यातील उद्धर या तलावातील गाळ प्रथम काढण्यात आला. या गाळाचा लाभ परिसरातील ३० शेतकऱ्यांना झाला आहे. तालुक्यातील आणखी सहा तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तहसीलदार निंबाळकर यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, सिद्धेश्वर तलावात गेल्या अनेक वर्षांपासून हा गाळ साठलेला होता. त्यामुळे तो गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याकरिता शेतकºयांना मोफत मिळणार असल्याने लाभ होणार आहे.
शिवाय येत्या पावसाळ्यात या तलावात पाणी अधिक प्रमाणात साठून परिसरातील विहिरींच्या जलपातळीत वाढ होणार असल्याने येथील शेतकरी सुखावले आहेत. सिद्धेश्वर तलावातील गाळाचा लाभ सुमारे ३० शेतकºयांना होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्या विद्या यादव, योगेश सुरावकर, ग्रामसेवक नितीन भोसले, श्रीकांत दुर्वे, संतोष जाधव, महादेव कदम, सुनील पोगडे, कृष्णा वाघमारे व शेतकरी उपस्थित होते.