पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील अंबा नदीचे पाणी आणखीनच गढूळ व दूषित झाले आहे. संपूर्ण पाणी मातकट रंगाचे झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून व गळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तसेच साठवण टाक्यांमध्ये गाळ साठला असल्यास तोदेखील साफ करून काढला जाईल, अशी माहिती पाली सरपंच गणेश बाळके यांनी दिली.
पालीकरांना येथील अंबा नदीच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायकाचे क्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक येत असतात. पालीची लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.
पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांनी मागील चार-पाच वर्षांपासून हा विषय वारंवार मांडला आहे. मात्र, अजूनही प्रशासन व राजकारण्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही.
निवडणुकीत भांडवलाचा मुद्दाच्पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील आजतायागत ही योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांनी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल के ले आणिश्रेयही घेतात. मात्र, एकदा निवडणुका संपल्या की, त्यांना या गोष्टीचा विसर पडतो.गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहे. तरी गावातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून प्यावे.- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत पाली