विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यात मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीत सध्या सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करणार असून, त्यासाठी प्रभागानुसार शासकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी व शिक्षक यांच्या स्पेशल टास्क टीमची निर्मिती केली असल्याची माहिती पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी गुरुवारी दिली.
बुधवारी प्राप्त आकडेवारीनुसार, सुधागड तालुक्यात ४३ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील तब्बल ३२ रुग्ण हे पालीतील आहेत. पालीतील ३ ते ४ जणांचा कोरोनामुळे मृत्युदेखील झाला आहे. परिणामी, पालीतील नागरिक घाबरले आहेत. या पार्श्वभूमीवर पालीतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्पेशल टास्क टीमची निर्मिती केली आहे.पालीतील प्रत्येक प्रभागात एक ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या सोबत प्रत्येकी १ सरकारी अधिकारी, १ आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू), २ आशा सेविका, १० शिक्षक आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३ अधिकारी असणार आहेत. तहसीलदार दिलीप रायन्नावार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत मढवी, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, सरपंच गणेश बाळके, उपसरपंच विजय मराठे व ग्रामविकास अधिकारी ए. एस. जमधाडे यांच्या देखरेखीखाली ही टीम काम करणार आहे. घराघरांत जाऊन लोकांची तपासणी व माहिती घेतली जाणार आहेतहसीलदारांचे आवाहनआजारी पडल्यास लोकांनी घरी बसू नये. ताबडतोब सरकारी दवाखान्यात जावे. खासगी डॉक्टरांनीही कोविडची लक्षणे असणारा रुग्ण आल्यास ताबडतोब त्यांची कोविड टेस्ट करण्यास सांगावे किंवा त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवावे.