नगरपंचायतीसाठी पंचरंगी निवडणूक
By Admin | Published: December 22, 2015 12:34 AM2015-12-22T00:34:24+5:302015-12-22T00:34:24+5:30
खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खालापूरमधले निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून शेकाप
अमोल पाटील, खालापूर
खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खालापूरमधले निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व भाजपा अशी पंचरंगी निवडणूक खालापूरमध्ये होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार प्रचाराला लागले असून मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत असून सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे. खालापूरमध्ये शिवसेना १७, शेकाप १५, राष्ट्रवादी १०, मनसे ८, भाजपा ४, काँग्रेस १ व ८ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूरमध्ये शेकाप व शिवसेनेची चांगली ताकद आहे. निवडणुकीच्या रिंगणात ६ प्रमुख राजकीय पक्ष असले तरी शेकाप आणि शिवसेनेतच खरी लढत अपेक्षित आहे. अन्य पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांवर शेकाप व शिवसेनेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. खालापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून खालापूरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान कुणाला मिळतो याची उत्सुकता आहे.
निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार प्रचाराला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांचा भर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर असून घरोघरी जावून उमेदवार मतदारांच्या भेटी घेत असल्याचे चित्र सध्या खालापूरमध्ये पहायला मिळत आहे. शेकाप व शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत चमत्कार करायची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे तालुका चिटणीस वैभव भोईर खालापूरचे रहिवासी असल्याने आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मनसेने जिल्हाध्यक्ष मनीष खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जायची तयारी सुरू केली आहे. खालापूरमध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून यावेत यासाठी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र येरूणकर व नेते एकनाथ पिंगळे लक्ष देत आहेत.