अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समिती सदस्यांनी मंगळवारी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री मांडवा जेटीवर क्रुझ पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. सकाळपासून केलेल्या कामाचा थकवा दूर करण्यासाठी साग्रसंगीताचीही व्यवस्था करण्यात आल्याने क्रुझवरील त्यांची ‘चंदेरी सफर’ खूपच अविस्मरणीय अशीच झाल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पाहुण्यांच्या सेवेमध्ये कोणतीच कसर भासू नये याची दक्षता घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाºयांचा अख्खा स्टाफ मांडवा जेटीवर उतरवल्याचे दिसून आले.जिल्हा परिषदांचा कारभार सुरळीत सुरूआहे की नाही हे पाहण्यासाठी राज्य सरकार पंचायत राज समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवते. आमदार सुधीर पारवे अध्यक्ष असलेली २७ सदस्यांची समिती सध्या रायगड जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौºयावर आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत तब्बल ५२ लेखाआक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यांची झाडाझडती घेण्यासाठी मंगळवारी बोलावलेली बैठक त्यांनी दोनच तासांमध्ये गुंडाळली होती. समितीने एका तीन तारांकित हॉटेलमध्ये शाही पाहुणचार आटोपल्यानंतर रात्री मांडवा जेटीकडे प्रस्थान केले.मांडवा जेटीवर आयोजकांनी त्यांच्यासाठी क्रुझ पार्टीची व्यवस्था केल्याचे दिसून आले. समुद्रामध्ये उभ्या असलेल्या दोन क्रुझना रंगबेरंगी लाइटिंगने सजवले होते. एका क्रुझमध्ये खाण्याची, तर दुसºया क्रुझमध्ये नाचगाण्याची अणि ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पार्टीला सुरुवात झाली. मांडवा समुद्रामध्ये पाहुण्यांना क्रुझने फिरवण्यात आले. समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे आणि श्रीकांत देशपांडे यांच्यासह एक सदस्य सहकुटुंब पार्टीसाठी आले होते. विक्रम काळे आणि वीरेंद्र जगताप हे दोन सदस्य अलिबाग येथील तुषार विश्रामगृहात महत्त्वाच्या कामात व्यस्त होते, असे सूत्रांनी सांगितले.स्थानिक आमदार भरत गोगावले, बाळाराम पाटील, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नृपाल पाटील यांचाही वावर मांडवा जेटीवर दिसून आला. मांडावा जेटीवर वाहने जाण्यास मज्जाव केला जातो, मात्र समितीसाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले होते, तसेच पार्टी सुरू झाल्यावर जेटीकडे समिती सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही सोडण्यात येत नव्हते. रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास क्रुझवरील कार्यक्रमाची सांगता झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
पंचायत राज समितीने केली क्रुझमध्ये पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:11 AM