वैभव गायकर
पनवेल : नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरातील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई, उपनगर, ते कल्याण, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
वनविभागाने अधिकृतरीत्या याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसला तरी यावर्षी देखील पर्यटकांना पांडवकडा धबधब्याचे जवळून दर्शन दुर्लभच असणार आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र, अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक अपघात घडल्याने तो बंद करण्यात आला.वनविभागाने पांडवकडा धबधब्याच्या परिसरात विविध कामेदेखील केली आहेत. त्यामध्ये नेचर पार्कअंतर्गत प्रस्तावित कामांपैकी जल व मृद संधारण, दगडी नाला बांधणीच्या कामांचा समावेश असून प्रस्तावित क्षेत्रांपैकी ५५० हेक्टर क्षेत्रावर २४,५९८ घ.मी. नाला बांधण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिमेंटची भिंत उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २९ लाख रुपयांचा निधी मागील वर्षी देण्यात आला होता.पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश द्यावा की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करून याबाबत निर्णय घेतला जाईल.- डी. एस. सोनावणे,अधिकारी, वनविभाग पनवेलपांडवकडा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नवी मुंबईमध्ये अशाप्रकारे नैसर्गिक पर्यटनस्थळ मोजकीच आहेत.वनविभागाने सुरक्षा यंत्रणा राबवून पर्यटकांना धबधब्यावर प्रवेश दिला पाहिजे, तशी मागणी करणार आहोत.- लीना गरड,नगरसेविक, पनवेल