- आविष्कार देसाईअलिबाग : समाजामधील तेढ वाढून समाजमने दुभंगली जात आहेत. जातीपातीचे राजकारण करून आपापसातील तंटे-बखेडे वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. समाजामधून माणुसकीच हरवत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे असे, असतानाच दुसरीकडे अद्यापही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन अलिबाग तालुक्यात पहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे पक्षी-प्राणीही त्रासले आहेत. या कालावधीत त्यांची तहान भागविण्यासाठी कनकेश्वर येथील पर्वतराजीत २५ ठिकाणी पाणपोई केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. माणसातील माणुसकीचे दर्शन चोरोंड-मुशेत येथील वंदे मातरम् ग्रुप आणि मांडव्याच्या लायन्स क्लबने घडवून सर्वांनाच आदर्श घालून दिला आहे.सध्या पारा हळूहळू वर चढत असल्याने वातावरणामध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी तर प्रचंड उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर रायगड-भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशावर पोचले होते. यंदाही तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याची प्रचिती आता प्रत्येकालाच येताना दिसत आहे.वाढत्या तापमानाचा तडाखा हा मानवाला बसत आहे, त्याचप्रमाणे निसर्गातील पशू-पक्षी, प्राणी, वनस्पती झाडे हेही त्याच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. त्यामध्ये फरक एवढाच की, त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. परंतु त्यांच्या भावनांची कदर, त्यांना होणाºया त्रासाची दखल अलिबाग तालुक्यातील चोरोंडे-मुशेत येथील वंदे मातरम् ग्रुपने घेतली आहे. या तरुणांच्या संघटनेचे नितीन अधिकारी यांनी मुक्या प्राण्यांसाठी पाणपोईची संकल्पना मांडली. त्यानंतर लगेचच मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष सुबोध राऊत यांनी ती उचलून धरली. राऊत यांच्या मदतीने कनकेश्वर पर्वराजीमध्ये २५ पाणपोई निर्माण करण्याचा निर्धार केला आणि त्या दिशेने त्यांनी संयुक्तरीत्या कामही सुरु केले.कडाक्याच्या उन्हामध्ये पाणतळ, तलाव, डोह, नद्या, ओहळ हे आता आटत चालले आहेत. त्यामुळे काहीच दिवसांमध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड होणार आहे. यासाठी कनकेश्वर पर्वतराजी परिसरातील २५ ठिकाणांचा शोध घेण्यात आला जेणेकरुन त्या ठिकाणी पाणपोई उभारणे शक्य होईल, असे वंदे मातरम् ग्रुपचे चंद्रशेखर सुर्वे यांनी सांगितले.तहानलेल्या मुक्या पशू-पक्ष्यांना पाणी दिल्याचे समाधान शब्दामध्ये वर्णन करणे कठीण आहे. पक्षी पाणी पिऊन आकाशामध्ये उंच भरारी घेतात तेव्हाच कळते की, ते समाधानी झाले आहेत, त्यांची तहान भागली आहे. हे सर्व त्यांच्या चेहºयावर दिसत नसले तरी, त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसून येते असे नितीन अधिकारी यांनी सांंगितले. प्रत्येकाला अशा ठिकाणी येऊन मुक्या पशू-पक्ष्यांसाठी काम करता येत नसेल तर, त्यांनी आपल्या घराच्या बाहेर, खिडकीमध्ये वºहांड्यात एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी ठेवावे. असे केल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल.- पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध होऊन त्यांना ते पिता यावे यासाठी विशिष्ट बाटलीमध्ये पाणी टाकून त्यातील पाणी बाटलीच्या खाली असणाºया झाकणामध्ये कसे येईल याची रचना करण्यात आली. त्यानंतर तशा २५ पेक्षा अधिक पाणपोई बनवण्यात आल्या. कनकेश्वर पर्वतराजीमध्ये विविध जातींचे छोटेमोठे दुर्मीळ पक्षी आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष सुबोध राऊत यांनी स्पष्ट केले. पक्ष्यांसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईमधील पाणी संपले की त्यामध्ये पुन्हा भरण्याची व्यवस्था आहे. पाणी भरल्यानंतर तेथे खाद्यही ठेवले जाते.
कनकेश्वरच्या पर्वतराजीत पाणपोई केंद्र; कडकउन्हात पक्षी-प्राण्यांसाठी झाली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:40 AM