नागावमध्ये लेप्टोसमान लक्षणे असलेल्या आजारामुळे नागरिकांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:31 PM2020-11-19T23:31:35+5:302020-11-19T23:31:48+5:30
कोरोना संपला तोवर नवे संकट : किनारपट्टीलगत परिसरात प्राणिजन्य आजारांत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोना, चक्रीवादळ व आता लेप्टोसमान लक्षणे असलेल्या आजारामुळे नागावमधील नागरिकांत घबराट पसरली आहे. नागावमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातच आता नागावमध्ये लेप्टोसमान लक्षणांमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
कोकण विभागात हा आजार विशेषकरून आढळतो. पर्यावरणात झपाट्याने होणारे बदल, रासायनिक खतांच्या वापराने करण्यात येणारी आधुनिक शेती या व अशा अनेक कारणांमुळे किनारपट्टीलगतच्या परिसरात लेप्टोसारख्या प्राणिजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात या आजाराचे रुग्ण आढळतात.
लेप्टो हा प्रामुख्याने जनावरांत आढळणारा संसर्गजन्य आजार आहे.
लेप्टोस्पायरा या जीवाणूच्या २३ प्रजाती आहेत. उंदीर, घुशी तसेच अन्य पाळीव प्राणी यामुळे या आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो. पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना हा आजार होण्याची अधिक शक्यता असते.
शेत मजूर, भातशेती करणारे लोक, कत्तलखान्यातील कामगार, मासेमार अशा व्यक्तींना या रोगाची विशेष करून लागण होते. तसेच याचा संसर्ग झालेल्या जनावराच्या मूत्र, रक्त अथवा मांसाशी प्रत्यक्ष संपर्क आल्याने या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम अथवा नाक, तोंड, डोळे यांच्या अभित्वचेमार्गे या रोगाचे जंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात, अशी माहिती डॉ. प्रियांका नाईक यांनी दिली.
अचानक चार ते पाच ग्रामस्थांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांत नागाव ग्रामपंचायत हद्दीत अचानक चार ते पाच ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यात लेप्टोच्या आजाराची लक्षणे आढळून आली असल्याचे वाटते. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव पसरू नये तसेच नागरिकांना आपला जीव गमवावा लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी तसेच जनजागृती करावी. यासाठी नागाव ग्रामपंचायतीमार्फत आजच जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र दिले आहे.
शेतकरी झाले त्रस्त
लेप्टोस्पायरा या जीवाणूच्या २३ प्रजाती आहेत. उंदीर, घुशी तसेच अन्य पाळीव प्राणी यामुळे या आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो. शेतकरी या आजाराने त्रस्त झाले आहेत. याबाबत काय उपाय करावे यासाठी जनजागती करण्याची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असल्याचे नागाव ग्रापंचायतीचे सरपंच निखिल मयेकर यांनी सांगितले.
तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे प्रमुख लक्षणे
या आजारात तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे ही प्रमुख लक्षणे आहेत. मुत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यूही ओढवतो. बऱ्याच वेळा रुग्णांची लक्षणे किरकोळ वा समजून न येणारी असतात.
प्रत्येकाने कोरोनाप्रमाणेच लेप्टोच्या आजाराचीसुद्धा काळजी स्वत:च घ्यावी. दूषित पाणी, माती यांच्याशी संपर्क टाळावा. हा आजार माणसापासून माणसाला होत नाही. दूषित पाण्याशी संपर्क ठेवू नये, अपरिहार्य असल्यास रबरबुट, हात-मोजे वापरावेत.
भातशेतीत काम करणाऱ्या शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नयेत याचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रियांका नाईक यांनी सांगितले.