माठांपेक्षा पाणीजार जोरात, रायगडमध्ये पाच वर्षांत ट्रेण्ड बदलला
By निखिल म्हात्रे | Published: April 15, 2024 04:49 PM2024-04-15T16:49:01+5:302024-04-15T16:51:00+5:30
काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत.
अलिबाग : उन्हाळा सुरू झाला की, मातीचे माठ खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळत होती. आता त्याऐवजी पाण्याचे जार घरोघरी दिसत आहेत. ग्रामीण भागातही या व्यवसायाने चांगलेच बस्तान बसवले आहे.
काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करत होते. त्यामुळे माठाला प्रचंड मागणी होती, पण अलीकडे हे दिवस संपले आहेत.
शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे ‘उद्योग’ उघडण्यात आल्याने व या पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही, या धंद्यामध्ये स्पर्धाही मोठी आहे.
जारमध्ये पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० लीटरसाठी ७० रुपये किंमत होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली. पाण्याच्या जारचे दर हळूहळू कमी होत गेले. ७० रुपयांवरून हा दर घरपोच ५० रुपये झाला.
दीड ते दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही आता माठ खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
थंड पाण्याच्या जारमुळे पारंपरिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येत १०० ते १५० पर्यंतच्या किमतीचे माठ विक्री करत होतो. आता शंभर, दोनशे माठ विकले जात नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. - रविकिरण नांदगावकर, माठ व्यावसायिक.