दासगावमध्ये पांजीचा उत्सव
By admin | Published: May 14, 2017 10:49 PM2017-05-14T22:49:51+5:302017-05-14T22:49:51+5:30
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे आयुष्य देखील ब्लॉक झाले आहे, अशी परिस्थिती असली तरी वैयक्तिक विचार सोडून सर्वांना एकत्र आणणारा पांजीचा उत्सव ग्रामीण भागात साजरा होतो. गावातल्या मूळ घरात संपूर्ण भावकी एकत्र येवून गावकीच्या साक्षीने तीन दिवसांचा हा पांजीचा उत्सव साजरा करतात. दासगाव येथील निवाते कुटुंबीयांनी नुकतीच पांजी साजरी केली. इतर सणांसोबतच पांजीच्या या निमित्ताने दासगावमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पांजी हा उत्सव मूळचा धार्मिक उत्सव आहे. एखाद्या आडनावाचे कुटुंब कोणते दैवत मानते त्यानुसार पांजीच्या या उत्सवात थोडाफार बदल होतो. मात्र देवांची घडणावळ, नवीन देव्हारा, मिरवणूक, अभिषेक, देवांची स्थापना आणि शेवटी गोंधळाचा कार्यक्रम असा साधारणपणे तीन दिवस चालणारा हा उत्सव असतो. यामध्ये दोन दिवस गोड जेवण तर तिसरा म्हणजे शेवटचा गोंधळाचा दिवस हा तिखट जेवणाचा असतो. साधारणपणे तीन वर्षांनी प्रत्येक घराण्यात पांजीचा हा उत्सव साजरा केला जातो. घरातील बुजुर्ग मंडळी याची तयारी करतात आणि नातलग किमान एकतरी कुटुंब प्रतिनिधी पांजीच्या या उत्सवाला हजेरी लावतात. लग्नकार्य अगर दु:खी प्रसंगामध्ये येणं जमलं नाही तरी पांजीचा उत्सव कोणतीही सहसा सोडत नाही. त्यामुळे पांजीच्या या उत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूरवर गेलेल्या माणसांना गावी परत आणणारा पांजीचा उत्सव आहे.
१० ते १२ मे असे तीन दिवस दासगावमध्ये निवाते कुटुंबियांची पांजी साजरी झाली. १० मे रोजी निवाते कुटुंबियांच्या कुलदैवताचे कांदले घडवून आणण्यात आले. किशोर जाधव यांच्या घरी पूजापाठ करून त्यांची एक भव्य मिरवणूक काढून भोईवाडा येथे निवाते कुटुंबियांच्या मंदिरामध्ये विधिवत स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पूजा विधी आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रत तर शेवट तिसऱ्या दिवशी तुळजाभवानी मातेचा गोंधळ करण्यात आला.
हिंदू धर्मातील सर्वच घराण्यांमध्ये पांजीची प्रथा आहे. ही प्रथा कशी आणि कधी सुरू झाली, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र देवीदेवता आणि घराण्याची माहिती देणाऱ्या या भाटाच्या मार्गदर्शनाखाली पांजीचा विधी पार पाडतात.