- वैभव गायकरपनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक सुविधा व शहरी भागातील पाण्याचा प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत चांगलेच चर्चिले जाण्याची शक्यता आहे.पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्याने संपूर्ण जिल्ह्याशी संपर्क येणार, असा हा मतदारसंघ बनला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स आदी महत्त्वाचे असे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. भविष्यात या मतदारसंघात लाखोंची रोजगारनिर्मिती होईल, याबाबत शंका नाही. मात्र, सद्यस्थितीत पनवेलमध्ये पाणीसमस्या गंभीर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जलस्रोत आणि जलसाठा अपुरा पडत असल्याने अनेक नोड, वसाहती तहानलेल्या आहेत. तर ग्रामीण भागात रस्ते, आरोग्य सुविधा आदी सुविधांचा अभाव आहे.पनवेल महापालिकेत २९ गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पालिकेच्या मार्फत विविध विकासकामे केली जाणार आहेत. २९ गावांपैकी पहिल्या टप्प्यात चार गावांना स्मार्ट करण्याच्या हेतूने पालिकेने ६४ कोटींचा तरतूद केली आहे. या संदर्भात कामांनाही सुरुवात झाली आहे. मात्र, इतर गावातील कामकाज ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या हजारो एकर जमिनी (सिडको) शासनाने नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित केल्या, यापैकी पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश मोठा आहे. सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने अद्यापही सोडविण्यात आलेली नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.तालुक्यासाठी आलेला निधीपालिका क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात चार गावे स्मार्ट बनविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या मार्फत ६४ कोटींची निधीची तरतूद, सिडको नोडमध्ये विकासकामासाठी कोट्यवधींची तरतूद.या व्यतिरिक्त आमदार निधी, जिल्हा नियोजन आदीसह विविध प्रकारच्या निधीचा वापर पनवेल विधानसभा क्षेत्रात करण्यात आला आहे.
पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 1:44 AM