पनवेल: कर्नाळा अभयाणारण्य हे पनवेल तालुक्यात पर्यटन आणि वन्यजीवांचा अधिवास असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी बुद्ध जयंती निमित्त वन्यजीव प्राण्यांची गणना होत असते. वर्षभरातील सर्वात मोठी रात्र असल्याने बुद्ध जयंतीच्या दिवशी दरवर्षी हि गणना केली जाते. यावर्षी देखील दि.23 रोजी काही संस्थांच्या मदतीने कर्नाळा अभयारण्य प्रशासनाने 24 तास पाण्याची देखरेख करीत पाणवठ्यावर ट्रॅक कॅमेरे लावत हि गणना केली. यावेळी दुर्दैवाने बिबटे मात्र कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत.
ठराव प्राणी सोडले तर कर्नाळा अभयारण्यात पक्षाचा किलबिलाट वाढला असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. तीन पाणवठ्यावर कर्नाळा अभयारण्याचे आठ कर्मचारी आणि संस्थांचे 10 असे 18 कर्मचारी प्राणी आणि पक्षांची हालचाल टिपत होते. एकूण तीन ठिकाणी पाणवठ्यावर मचान बांधून तीन पथकांनी केलेल्या सर्वेक्षणात विविध प्राणी आणि पक्षांची नोंद करण्यात आली. मयूर बंधारा, अभयारण्यातील माहिती केंद्रातील तलाव, आपटा येथील कृत्रिम पाणवठा आदी ठिकाणी मचाण बांधण्यात आले होते. यादरम्यान विविध प्राणी आणि पक्षी या निरीक्षकांना दिसले. यामध्ये खार, उद मांजर, हनुमान लंगुर, रानडुक्कर आदी प्राणी दिसून आले. मात्र बिबट्यासह बेकर, हरिण, ससा यांच्यासारखे प्राणी मात्र या निरीक्षणात दिसले नाहीत. दिवसेंदिवस याठिकाणचे प्राणी अभयारण्यातून दिसेनासे झाले आहेत. माकड वगळता कोणतेही प्राणी इतर वेळी देखील सहजरित्या दिसत नसल्याने त्याठिकाणची प्राणी संख्या कमी होत चालली आहे. कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला जंगलाचा ऱ्हास, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम या सर्वावर होत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाळा अभयारण्य मुख्यत्वे करून पक्षी अभयारण्य म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.त्यानुसार अभयारण्यात पक्षांची किलबिलाट मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांसाठी देखील कर्नाळा अभयारण्य उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निसर्गाचा ह्रास वन्यजीवांच्या मुळावर कर्नाळा अभयारन्यात नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. फार्म हाऊस संस्कृती उदयास येत असल्याने नैसर्गिक संपदेचा ह्रास होत असल्याने जंगले नष्ट होत असल्याने अनेक प्राणी कर्नाळा अभयारण्यातून नष्ट होत चालले आहेत. यापूर्वी याठिकाणी पाहिला जाणारा बिबट्या देखील दिसेनासा झाला आहे.
या पक्षांचा किलबिलाट पर्णपक्षी, रानपिंगळा, कटुर्गा, श्यामा, शिळकस्तुर, सुबक, शिपाई बुलबुल, निळमणी, काळ्या डोक्याचा हळद्या, हरियाल, पाचूहोला, खंड्या, वेडा राघू, रान कस्तूर, पान कावळा, कोतवाल, महाभृंगराज, नवरंग, भारतीय कोकीळ, भारद्वाज, दयाळ, टिपकेदार होला, घार, सातभाई,हळद्या, तरेवाला बुलबुल, पाचुहोला, मोनार, बगळा, कोतवाल, पांढऱ्या छातीचा किंगफिशर, काळ्या डोक्याचा हळद्या, घुबड, पर्वती कस्तूर, रानपिंगळा, तपकिरी, डोक्याचा कुटूरगा, तांबट, भारद्वाज, महाभृंगराज, कावळा, बगळा, डोकावळा, कोकिळ, वटवाघुळ,बुलबुल, कोतवाल, सनबर्ड, होला, वेडाराघू, रातवा, हरियाल, कावळा, टकाचोर, बगळा, मोर, रानकोंबडा, डोकावळा, बारबेट, कोकीळ, वटवाघुल, राखी धनेशे, टिटवी, भारद्वाज, पावश्या, सुभग, तपकिरी वन घुबड आदी पक्षी या सर्वेक्षणात आढळले आहेत.
कर्नाळा अभयारण्य पक्ष अभयारण्य असल्याने सर्वेक्षणात पक्षी मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. 18 जणांच्या तीन पथकांनी वन्य जीव गणनेच काम पाहिले.नारायण राठोड (वनक्षेत्रपाल,कर्नाळा अभयारण्य)