पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:58 AM2018-08-19T03:58:09+5:302018-08-19T03:58:47+5:30

रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Panvel-Mumbra highway in Khaddi; Increase in Accidents with Transportists | पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

Next

- अरुणकुमार मेहेत्रे 

कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेष करून कळंबोली गाव ते फायरब्रिगेड या दरम्यान रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. उड्डाणपुलाचे काम करीत असलेल्या टी अ‍ॅण्ड टी कंपनीच्या नाकर्तेपणाचे हे प्रतीक असल्याचा आरोप एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी केला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणीही महामार्गाची परिस्थिती चांगली नाही.
पनवेल-मुंब्रा महामार्गाची स्थिती पनवेल-सायन महामार्गासारखी आहे. कळंबोलीमध्ये उड्डाणपूल उभारीत असलेली टी अ‍ॅण्ड टी कंपनी पूल उभारीत आहे. पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी कळंबोली गाव ते फायरब्रिगेड या दरम्यान दोनही मार्गिकेची चाळण झाली आहे. रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. संबंधित कंपनी आणि रस्ते विकास महामंडळ बघ्याची भूमिका घेत आहेत. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता चांगला केला जात नाही, तीच परिस्थिती सर्व ठिकाणी या महामार्गावर आहे. ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते, त्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अतिशय बिकट असते. रस्ते विकास महामंडळाला ज्या ठिकाणी खड्डे पडतात, तिथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे क्र मप्राप्त आहे; परंतु तसे होत नसल्याने खड्ड्यांचे रडगाणे दरपावसाळ्यात गायले जाते. याप्रश्नी संबंधित यंत्रणांनी ठोस धोरण अवलंबून कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. टी अ‍ॅण्ड टी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, कळंबोली गावालगत भुयारी मार्ग असावा, या मागणीकरिता स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. मध्यंतरी काही दिवस काम करता आले नाही.
पाऊस सुरू झाल्याने आणखी अडचण आली. चार दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील.

टी अ‍ॅण्ट टी कंपनीने गेल्या दोन पावसाळ्यांत कळंबोलीकरांची गैरसोय केली आहे. त्याचे बक्षीस म्हणून टी अ‍ॅण्ड टी कंपनीला एमएसआरडीसी आणि सिडकोने पुढील काम दिले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करावे तितके कमीच आहे. कळंबोली फायरब्रिगेड ते काळभैरव मंदिर या दरम्यानचा रस्ता पाहिल्यानंतर ही नवी मुंबई आहे का की ग्रामीण रस्ता? असा प्रश्न पडतो. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार आहोत.
- चंद्रकांत राऊत,
अध्यक्ष,
एकता सामाजिक सेवा संस्था

Web Title: Panvel-Mumbra highway in Khaddi; Increase in Accidents with Transportists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.