पनवेल : पाच महिन्यांनंतर प्रथमच पनवेल महानगरपालिकेची आॅनलाइन महासभा आयोजित केली जात आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे महासभा आयोजित करता न आल्याने, नगरसेवकांच्या आग्रहास्तव ३१ आॅगस्ट रोजी ही सभा फडके नाट्यगृहात घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे पदाधिकारी वगळता, उर्वरित नगरसेवकांना घरात अथवा कार्यालयात बसून आॅनलाइन पद्धतीने या सभेत सहभागी होता येणार आहे.या सभेला महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसचिव, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, सर्व विषय समित्यांचे सभापती आदी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकणार असल्याची माहिती नगरसचिव तिळकराज खापर्डे यांनी दिली. दि. ३१ रोजी सकाळी ११.३० वाजता ही सभा पार पडणार आहे. वेबेक्स.कॉम या वेबसाइटवर ही सभा पार पडणार आहे. प्रथमच अशा प्रकारे आॅनलाइन महासभा आयोजित करण्यात आल्याने याबाबत साशंकता आहे. कारण प्रत्यक्ष महासभेवेळी नगरसेवक प्रश्न विचारण्याच्या वेळेला गोंधळ घालताना दिसून येतात. अनेक वेळा या नगरसेवकांचे आपापसात खटकेही उडत असतात.
पनवेल महानगरपालिकेची होणार ऑनलाइन महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 2:35 AM