पनवेल पालिकेची स्थायी समिती सभा पुन्हा तहकूब; अर्थसंकल्पावरील सभा थेट एप्रिलमध्ये होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:37 PM2021-03-24T23:37:48+5:302021-03-24T23:38:00+5:30
२२ मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता कर वाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेली सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. आता अर्थसंकल्पावरील सभा थेट एप्रिलमध्ये पार पडणार असून, तत्पूर्वी मालमत्ता करासंदर्भात विशेष सभा भरविण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी याबाबत अनुकूलता दाखवत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
२२ मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता कर वाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते. या वेळी मालमत्ता करासंदर्भात विशेष सभा लावा, अन्यथा कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. २४ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत ही सभा तहकूब करायला लावली. आधी मालमत्ता कराबाबत निर्णय घ्या, नंतर सभा घ्या, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. भाजप नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी मालमत्ता करासंदर्भात आयोजित सभेत मालमत्ता करावरील चर्चा केल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा करता येईल, असे स्पष्ट केले.
७७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झालेला आहे. मात्र, होणारा विरोध लक्षात घेता सत्ताधाऱ्यांना याबाबत दोन पावले मागे यावे लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता कराची अंदाजित रक्कम अर्थसंकल्पातून कमी होण्याची शक्यता आहे. २२ मार्च रोजीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पत्रकारांना वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना सन्मानाने पुन्हा बोलावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे