Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई
By वैभव गायकर | Published: October 19, 2023 05:49 PM2023-10-19T17:49:39+5:302023-10-19T17:50:21+5:30
Panvel News: महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
- वैभव गायकर
पनवेल - महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये औद्योगिक 100 मालमत्तांना, निवासी 301 मालमत्तांना , वाणिज्य ( कमर्शिअल) क्षेत्रातील 349 मालमत्ता अशा एकुण 750 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
याकरिता खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही नोडमध्ये आठ पथक तयार करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे.न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवरती भर देत आहे.महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक , निवासी , वाणिज्य ( कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता अटकावणी संबधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.
जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रत्येक प्रभागासाठी दोन अशी आठ पथके तयार केली आहेत. तसेच मालमत्तांधारकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्यामालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत 200 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते आजपर्यंत 475 कोटींची वसुली करण्यात आली.
मालमत्ता खरेदी विक्री करताना खबरदारी घ्या
नागरिकांनी मालमत्ता खरेदी विक्री करताना मालमत्ता आयडी (यूपीआयसी आयडी) नमुद करावा असे आवाहन मालमत्ता कर विभागाच्यावतीने केले आहे.जेणे करून सदर मालमत्तेचा मालमत्ता कर भरला आहे की नाही याची माहिती नागरिकांना त्वरीत कळणार आहे.
नागरिकांनी मालमत्ता खरेदी अथवा विक्री करताना महापालिकेचा मालमत्ता कर भरला आहे की नाही याची शहानिशा करूनच मालमत्ता खरेदी अथवा विक्री करावी असे अवाहन मालमत्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. येत्या काळात पनवेल शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या महानगरपालिकाही विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावरती आहे. महापालिकेचा विकास आराखडा राबविताना प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
- गणेश देशमुख (आयुक्त ,पनवेल महानगरपालिका)