पनवेल पंचायत समितीच्या आमसभेत प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:49 PM2020-02-14T23:49:29+5:302020-02-14T23:49:35+5:30

वेळेअभावी गुंडाळावी लागली सभा : प्रशासनाला धरले धारेवर

Panvel Panchayat Samiti General Assembly raises questions | पनवेल पंचायत समितीच्या आमसभेत प्रश्नांचा भडीमार

पनवेल पंचायत समितीच्या आमसभेत प्रश्नांचा भडीमार

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आमसभेमध्ये नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला; परंतु वेळेअभावी सर्व प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही. सभा अर्ध्यावरच गुंडाळावी लागली. लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदार महेश बालदी यांनी, आम्ही जसे सरळ आहोत तसे वाकडेही आहोत. पुढील सभेला येताना तयारी करूनच या, अशा शब्दात सुनावले.
पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्षपद आमदार महेश बालदी यांना देण्यात आले होते. या वेळी आमदार बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, गटविकास अधिकारी धोंडू तेटगुरे, माजी सभापती काशिनाथ पाटील, प्रणाली भोईर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, रत्नप्रभा घरत, आरडी घरत, देवेंद्र पाटील उपस्थित होते. तहसील विभाग, महावितरण, पुरवठा विभाग यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. जमीनविषयक, विजेचे खांब, विजेच्या तारा या विषयाच्या अनेक समस्या नागरिकांना मांडल्या. या समस्येतून नागरिकांची सुटका होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. आमसभेत नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. मात्र, नेहमीप्रमाणे याही वर्षी आमसभा अर्धवट गुंडाळावी लागली. तब्बल चार तास आमसभा सुरू होती. दोन ते तीन शासकीय विभागातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, त्यामुळे पुन्हा एकदा आमसभा आयोजित करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. धोदाणी येथील मंगेश चौधरी याने मालडुंगे रेशन दुकानामध्ये धान्य मिळत नसल्याची तक्र ार केली व यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला.
या वेळी पुरवठा शाखेने दुकानदाराला नोटीस काढली असल्याचे सांगितले. पनवेल तहसील कार्यालयात आदिवासी बांधवांची ३२४ वैयक्तिक वन प्रकरणे प्रलंबित आहेत. केवळ ३० सामुदायिक प्रकरणे भूमी अभिलेखकडे आली असल्याची माहिती भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी दिली.
या वेळी आमदारांनी यावर नाराजी व्यक्त केली. महसूल विभागातील प्रश्नांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक पंचायत समितीमध्ये लावण्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना सांगितले.

सभेच्या ठिकाणाविषयीही नाराजी
पहिल्यांदाच आमसभा फडके नाट्यगृह येथे घेण्यात आली. मात्र, येथे घेण्यात आलेल्या आमसभेत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरवर्षी ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये ही आमसभा आयोजित करण्यात येत असे. त्यामुळे पुढची आमसभाही ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
च्गेल्या वर्षी पारगाव-डुंगी या गावात पूर आल्यामुळे येथील नागरिकांना बाहेर स्थलांतरित करून भाडे देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी स्थलांतर केले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे भाडे मिळाले नसल्याने हे भाडे मिळावे, असे श्रीधर पाटील यांनी सांगितले. पारगाव-डुंगी ही गावे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येते. येथील घरांचा २०१३ प्रमाणे गुगल सर्व्हे करण्यात आला आहे.
मात्र, २०१९ प्रमाणे येथील घरांना पात्रता द्यावी, अशी मागणी या वेळी नागरिकांतर्फे करण्यात आली. आमसभेत नियोजन नसल्याचा आरोप आर. डी. घरत यांनी केला. त्यांनी गाढी नदी स्वच्छतेचा विषय मांडून आमदारांचे लक्ष वेधले. चिंचवली येथील रमेश पाटील यांनी रेशन दुकानदाराचा राजीनामा सहा वर्षे मंजूर होत नसल्याचा आरोप केला. अमिटी युनिव्हर्सिटीमध्ये किती बोअरवेल व त्या किती खोल मारण्यात आल्या आहेत, याची माहिती बडे यांनी मागितली.
च्तहसील कार्यालयात ३५ वर्षेवरील अविवाहित महिलेला एक हजार अनुदान देण्यात येते. मात्र, या अविवाहित महिलांकडूनही पतीच्या मृत्यूचा दाखला मागितला जात असल्याची खळबळजनक माहिती ज्ञानेश्वर बडे यांनी या वेळी कथन केली. चावणे येथील मारु ती पाटील यांनी आपली समस्या मांडताना, समस्या सुटली नाही तर पोलवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. वेळेअभावी आमसभा गुंडाळावी लागली असल्याने आमसभेत येऊन प्रश्न मांडता आले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Panvel Panchayat Samiti General Assembly raises questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.