पनवेल : बहुप्रतीक्षित पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, निधीअभावी मध्यंतरी रुग्णालयाचे काम रखडले होते. हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे. बुधवारी या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यादेखील उपस्थित होत्या.पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम अनेक वर्षे सुरू असल्याने त्या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. ५० टक्के आगाऊ रक्कम भरल्यावर १५ दिवसांत दवाखान्यासाठी आवश्यक फर्निचर मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. श्रावगे यांनी सांगितले. आरोग्य उपसंचालक डॉक्टर गौरी राठोड यांनी दवाखान्याला लागणारी उपकरणे आणि साहित्य आल्याशिवाय कर्मचारी नेमता येणार नसल्याची माहिती दिली. या उपकरणांची खरेदी हाफकिन मार्फत करावी लागते तसे केल्यास वेळ लागेल, असे सांगितल्याने यातून मार्ग काढण्यासाठी आणि तातडीने निधी कसा उपलब्ध करता येईल, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ताबडतोब आरोग्यमंत्र्यांबरोबर बैठक ठरवून घेतली आहे. उपजिल्हा रु ग्णालय लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे, याकरिता १५ डिसेंबरची डेडलाइन दिल्याचे समजते.या पाहणी दौऱ्यावेळी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर गौरी राठोड, रायगडचे सिव्हिल सर्जन एम. गवळी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एस. श्रावगे, उपअभियंता कांबळे आणि नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत आदीनी या वेळी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची डेडलाइन १५ डिसेंबर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:48 PM