- वैभव गायकर पनवेल - पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.आवश्यक असलेला 9 मीटरचा रस्ता देखील हे बांधकाम व्यावसायिक तसेच गोदाम मालक शेतकऱ्यांना देत नसल्याने मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पळस्पे ग्रामस्थांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गावाभोवती असलेली जेडब्ल्यूसी कंपनीअरिहंत गृहप्रकल्प या प्रकल्पामुळे शेतीला धोका निर्माण होत आहे.गोदामाच्या दूषित सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.तसेच ग्रामस्थांच्या वहिवाटीचा रस्ता अडवला गेला असताना तहसीलदार चुकीचा अहवाल देऊन ग्रामस्थांचा उपोषणच दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या दमयंती भगत यांनी केला आहे.एकीकडे गोदामांच्या दूषित पाण्यामुळे भातशेती नष्ट होत चालली असताना तहसीलदार विजय पाटील या प्रकरणात संबंधितांना क्लीन चिट देत असल्याचा आरोपही शेकापचे नेते अनिल ढवळे यांनी केला आहे.12 ग्रामस्थ उपोषणाला बसत असताना प्रशासनाची भूमिका बिल्डर धार्जिणी असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.
सल्ला देण्याऐवजी कारवाई का नाही ?पळस्पे मधील पाण्याचे प्रदूषण,रस्त्याची अडवणूक हे सर्व प्रकरण डोळ्या देखत असताना तहसीलदार विजय पाटील स्थळ पाहणी करून मामलेदार कोर्टात कमल 1906 कायद्याप्रमाणे दावा दाखल करण्याचा सल्ला ग्रामस्थांना देतात मात्र स्वतः सुमोटो म्हणुन याबाबत काहीच कारवाई करीत नसल्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी 32 ग्रामस्थांनी सह्यांची पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.