पनवेलचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेच्या लाटेने पनवेलकर बेजार
By वैभव गायकर | Published: April 29, 2024 03:45 PM2024-04-29T15:45:16+5:302024-04-29T15:46:43+5:30
हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेची यापूर्वीच सुचना दिली आहे.
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल :एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असताना दुसरीकडे आजच्या तापमानाने सर्वानाच मोठा घाम फोडला. पनवेल मध्ये दि.29 रोजी तब्बल 42 डिग्री अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेची यापूर्वीच सुचना दिली आहे.
उन्हाच्या वाढत्या झळा लक्षात घेता शीतपेय,रसवंती गृह आदी ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.42 डिग्री नोंद यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक सांगतात .उष्णतेच्या लाटेसदृश्य असणारी ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस अशीच राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.आजची सकाळ उगवली तेव्हाच सूर्यदेवाने पूर्ण दिवसाच्या तापमानाचा काहीसा ट्रेलर दाखवला होता. सकाळी 10 वाजल्यानंतरच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. तर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत तर सूर्यप्रकाशाऐवजी सूर्यदेव आग ओकत आहेत की काय असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा असेच सर्वत्र चित्र दिसून आले.
दरम्यान या उष्णतेच्या लाटेचा विचार करता नागरिकांनी विनाकारण उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, अधिकाधिक पाणी प्यावे आणि अतिश्रम टाळावे असा सल्ला पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी दिला आहे.