शहर सौंदर्यीकरणात ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पनवेल राज्यात अव्वल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 कोटींचे पारितोषिक
By वैभव गायकर | Published: April 20, 2023 04:16 PM2023-04-20T16:16:24+5:302023-04-20T16:17:55+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेच्या शिष्टमंडळाला 15 कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
पनवेल - महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दि. 20 रोजी नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेच्या शिष्टमंडळाला 15 कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहु नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला लाभली.पनवेल महानगरपालिकाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्विकारला.
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून सदरची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागातील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता.