पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:42 AM2018-12-09T00:42:31+5:302018-12-09T00:54:09+5:30

ग्रामीण भागातही पाण्याची समस्या गंभीर

Panvel 'water' again; Chances of getting water supply daily | पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Next

- वैभव गायकर

पनवेल : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. आबासाहेब वेदक (देहरंग) धरणातील अपुरा पाणीसाठा या गोष्टीला कारणीभूत ठरणार आहे. कारण या धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याची झळ पनवेलवासीयांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना दिवसाआड पाणी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.

पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात देहरंग धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देहरंग धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला खारघरमध्ये ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात त्या भागात ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. कामोठे नोडला ६० एमएलडीऐवजी फक्त ३५ एमएलडी पाणी दिले जाते. तळोजा नोडसाठी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ १० एमएलडी पाण्यावर येथील रहिवाशांची बोळवण केली जात आहे. नवीन पनवेल शहराला ४६ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ४० एमएलडी पाणी दिले जाते. पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गावांना केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट २९ गावांना अद्यापही बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ४०० कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत ४० जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. १६५ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, सद्यस्थितीत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण पालिका क्षेत्राला सध्याच्या घडीला २९५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पालिका क्षेत्राला सुमारे ८५ ते ९० एमएलडी तुटवडा भासत आहे.

२९ गावांना बोरिंग, विहिरींचा आधार
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड या ११ गावांचा यात समावेश आहे.

पाणी परिषद भरविण्याची मागणी
शहराला भेडसावणाऱ्या गंभीर पाणीप्रश्नावर पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. या अंतर्गत शहरासाठी पाण्याचे नियोजन, किती वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या पाणी परिषदेत देण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

पनवेलकरांना मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका

पाणीसाठा किती आहे, शेवटपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी भाजपामार्फत घेतली जाईल. पालिका प्रशासनासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल.
- प्रकाश बिनेदार, नगरसेवक

केंद्रापासून, राज्यात, पालिकेत सत्तेत भाजपा आहे. सिडको अध्यक्ष, महापौरपद भाजपाकडे असताना पनवेलकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. पालिका क्षेत्रातील अपुºया पाणीपुरवठ्यावरून खुद्द भाजपाच मोर्चे काढत आहे, हे हास्यास्पद आहे.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

Web Title: Panvel 'water' again; Chances of getting water supply daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.