पनवेल मध्ये डेंग्यूचा पहिला बळी, १७ वर्षांच्या श्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 05:32 PM2023-09-11T17:32:31+5:302023-09-11T17:33:10+5:30
पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांच्याकडून वृत्ताला दुजोरा
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: शहरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.मागील महिनाभरात हा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे.डेंग्यूची साथ झपाट्याने वाढत असताना कामोठे मधील 17 वर्षीय श्रिया सिंग या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान हा मृत्यू झाला आहे.
पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.दरम्यान सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पालिकेकडे डेंग्यूच्या 7 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.तर मलेरियाचे 35 रुग्णाची नोंद आहे.पालिका क्षेत्राबाहेरील भागाची आकडेवारी यामध्ये समाविष्ट नसल्याने हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.डेंग्यूचे साथ वाढत असल्याने नागरिकांनी खबारदारी घेण्याचे अवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे.दरम्यान कामोठे मधील या घटनेनंतर कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत शहरात फवारणी व धुरीकरण वाढविण्याची मागणी केली आहे.यावेळी डॉ सखाराम गारळे,राहुल आग्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.