पनवेल - पनवेल शहरात राहणारी ऋचा दरेकर ही पनवेलमधील भारतीय सेनादलातील पहिली लेफ्टनंट ऑफिसर बनली आहे. मूळचे कर्जत तलासरी येथील दरेकर कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. ऋचाचे बालपण, शिक्षण पनवेलमध्ये झाले आहे. ऋचाच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
ऋचाने तलवारबाजीत राष्ट्रीय स्तरावर देखील नेतृत्व केले आहे. वडील कृष्णकांत दरेकर हे व्यावसायिक आहेत तर आई ऍडव्होकेट सुकन्या दरेकर या पनवेलमध्ये वकिली करतात. विशेष म्हणजे प्रचंड जिद्द, मेहनतीने ऋचा ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ऋचा हीचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथे शिशु मंदिरात झाले तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूल मध्ये घेतले होते. ऋचा हीने जिल्हा व राज्य स्तरावर तलवार बाजी खेळामध्ये सुवर्ण पदके मिळवली असून ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. तिने रसायनी येथील पिल्लई कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मधून पदवी प्राप्त केली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे तिने एसएसबी मुलाखतीचा टप्पा देखील यशस्वीरित्या पार केला. यावेळी सहा हजार विद्यार्थी याठिकाणी मुलाखतीसाठी आले होते. याठिकाणी निवड झाल्यावर तिला चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे (ओटा) येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. नुकतेच तिने तिचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून चेन्नई येथे काल पासिंग आऊट परेड पार पडली.त्यानंतर ऋचा ही भारतीय लष्करात "लेफ्टनंट ऑफिसर" म्हणून नियुक्त झाली. मस्त पनवेलकर तिचे भरभरून कौतुक करत आहे. रतीय लष्करात नियुक्त झालेली पनवेलची पहिलीच महिला लेफ्टनंट म्हणून ऋचा दरेकरची नवी ओळख निर्माण झाली आहे.
लहानपणापासून ऋचा ही मेहनती आहे. आजवर तिने असंख्य पारितोषिके तलवारबाजीत जिंकली आहेत. शिक्षणातही नेहमी ती पुढे असायची. तिच्या या नव्या यशाबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतीय सैन्यात महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. हे आमच्या सर्व दरेकर कुटुंबियांसाठी अभिमानास्पद आहे.
- सुकन्या कृष्णकांत दरेकर (ऋचा दरेकरची आई )