कर्जत : शहरातील प्रथितयश समजल्या जाणाऱ्या कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण मुंबई बोर्डाला वेळेवर कळविले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी विविध प्रकारे आंदोलन केले; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही. अखेर पालक संघर्ष समितीने दिलेल्या इशाºयानुसार २ मेपासून शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
कर्जत शहरातील इंग्लिश मीडियम शाळेने २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या अतिरिक्त विषयांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. ५४ विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि दोन विद्यार्थ्यांचे गायन या विषयातील अतिरिक्त वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत कळविले गेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पालकवर्ग संतप्त झाला आहे. पालकांनी संघर्ष समिती स्थापन करून जोरदार उठाव केला असून, पालकांनी आपल्या पाल्यांसह २५ एप्रिल रोजी शाळेत येऊन शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरले होते. या वेळी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी टाळे आणून कर्जत इंग्लिश मीडियम शाळेला लावले. मुख्याध्यापक विनोद अळसुंदेकर आणि संस्थेचे सचिव श्रीकांत मनोरे यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण गुण मिळणार याची खात्री शाळा व्यवस्थापन देत नसल्याने पालकवर्ग संतप्त झाला. आताच्या आता कार्यकारिणी सदस्यांना बोलवून आणा, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला, त्यामुळे कर्जत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष झुलकरनैन डाभिया, कार्यकारिणी सदस्य विजय जोशी, शमा काळे, देवीचंद ओसवाल हे तेथे उपस्थित झाले. पालकांनी त्यांना विविध प्रश्न विचारले; परंतु आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. कर्जत पोलीसठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि २ मेपासून पालकवर्गाकडून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन देऊन इशारा दिला होता. त्यानुसार पालक संघर्ष समितीने लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली. शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा पोटे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून उपोषणास प्रारंभ केला. समितीचे युसूफ खान, कैलास पोटे, विजय जगताप, पंकज ओसवाल, मृणाल कदम आदीनी विद्यार्थ्यांसह साखळी उपोषणास सुरुवात केली.