आविष्कार देसाईरायगड : काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आराेग्य विभागाने वर्तविली आहे. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यातच तब्बल साडेआठ हजार शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी २३ नाेव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमाेर आहे. त्यामुळे काेराेनाच्या दहशतीपुढे पालकांना हात टेकण्यावाचून पर्याय राहिला नसल्याचे चित्र आहे.
काेराेनाला हद्दपार करताना प्रभावी लस निर्मितीचे संशाेधनही विविध देशांमध्ये सुरू आहे. दिवाळीपूर्वी काेराेनाचा प्रभाव कमी हाेत हाेता. याच कारणासाठी शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. मात्र, आता दिवाळीनंतर काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ हाेताना दिसत आहे. वातावरण असेच असेल तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, त्यांना काय झाले तर काेण जबाबदारी घेणार, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी करण्यास अलिबाग सरकारी रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सुरुवात झाली आहे. मात्र २३ नाेव्हेंबरपर्यंत साडेआठ हजार शिक्षक, प्राध्यापकांची काेराेना चाचणी कशी पूर्ण हाेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दर दिवसाला फक्त २२० काेराेना टेस्ट हाेत आहेत. त्यामुळे पुढील ६० दिवस चाचणी पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे सोमवारी शाळा कशा सुरू करणार, असाही प्रश्न आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.