वैभव गायकरपनवेल : आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या इंग्रजी माध्यमांकडे कल वाढला आहे. त्यातही सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांना पसंती दर्शवली जाते. मात्र, प्राथमिक शाळेबरोबरच पूर्वप्राथमिक (नर्सरी) शाळा प्रवेशासाठीही सध्या पालक नामांकित संस्थेचा विचार करू लागले आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की पालकांची धावाधाव सुरू होते. सध्याच्या घडीला शहरातील चौकाचौकांत नर्सरी, प्री-प्रायमरी स्कूलचे पेव फुटले आहे. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय दर्जाच्या प्री-स्कूलचाही समावेश आहे. अवघ्या दोन ते तीन तासांसाठी हे वर्ग भरत असते तरी त्यांच्याकडून वार्षिक शुल्क २० ते ५० हजार रुपये इतके आकारले जाते.
प्री-स्कूलच्या नावाने एक नवीन व्यवसाय नावारूपाला आला आहे. आई-वडील दोघेही नोकरी करीत असल्यास त्यांना पाल्याला फारसा वेळ देता येत नाही. त्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. यासाठी वेळप्रसंगी अतिरिक्त खर्च करण्याची त्यांची तयारी असते.बालवर्गाचे आधुनिक रूपच्पूर्वी मराठी माध्यमातून सुरू असलेले शिशूवर्ग, बालवर्गचे नर्सरी हे आधुनिक रूप मानले जाते. मात्र, अनेक नामांकित शाळांनीही हे वर्ग सुरू केल्याने, पाल्याचा शैक्षणिक श्रीगणेशा याच शाळांमधून व्हावा, यासाठी पालकांची धावाधाव सुरू असते.