पालकांनो, बालकांना सांभाळा, 'व्हायरल फिव्हर' चा वाढतोय धोका!
By निखिल म्हात्रे | Published: January 12, 2024 03:38 PM2024-01-12T15:38:19+5:302024-01-12T15:39:18+5:30
वातावरणातील बदलामुळे येत्या काळात बालकांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
निखिल म्हात्रे,अलिबाग : सततच्या वातावरणातील बदलामुळे येत्या काळात बालकांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. हिवाळा जितका आल्हाददायक आहे, तेवढाच आजारांना निमंत्रण देणारा ठरतो, असे वैद्यकीय क्षेत्रात मानले जाते. योग्य ती काळजी घेतली नाही तर साथीच्या आजारांची संख्या हिवाळ्यात वाढते. त्यातच लहान मुलांचे या वातावरणामुळे बिघडण्याची शक्यता अधिक असते. यावर वेळीच उपाययोजना करून आजारांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. या दिवसात लहान मुलांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पालकवर्गावर असते.
टायफॉईड, मलेरिया, कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो हे साथीचे आजार पसरण्याची भीती असते. दूषित पाण्यामुळेही अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. हवामानातील सततच्या बदलामुळे नियमित उकळलेले पाणीच मुलांना प्यायला देण्याचा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला. अवश्यक ती काळजी घेतली नाही तर बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला, सीझनल फ्लू म्हणजे एनफ्लुएंझाची लक्षणे आढळण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. पालकांनी बालकांची काळजी घेण्याची गरज आहे.
सध्या घ्यावयाची काळजी!
घाण, कचरा, चिखल व पाणी तुंबून ठेवणारी गटारे यामुळे आजाराची लागण जलद होत असते. वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी.
ताजे व शिजवलेले अन्न मुलांना द्यायें, तसेच आईस्क्रीम, कुल्फी, बर्फजन्य पदार्थ टाळावेत. मुलांना हलका आहारच द्यावा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार करावा.
सततच्या बदलत्या हवामानामुळे होणारे आजार -
सर्दी, ताप, खोकला, अतिसार, जुलाब, गॅस्ट्रो आणि सीझनल फ्लू म्हणजे एनफ्लुएंझा तसेच कॉलरा, मलेरिया, चिकनगुणिया, डेंग्यू हे आजार उदभवू शकतात. त्यामुळे आजाराची लागन पाहता वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी.
या दिवसात आवश्यक ती काळजी घेतली नाही तर लहान मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढतो. तूर्तास तरी व्हायरल फिव्हरचा धोका नसला तरी वातावरणातील बदलामुळे आगामी काळात सर्दी, ताप, खोकला यासह जलजन्य आजाराची शक्यता नाकारता येत नाही - डॉ. महालींग क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ.