मोहोपाडा : लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलविरोधात व मुख्याध्यापिकेच्या फीवाढ निर्णयाविरोधात तसेच तिच्या मनमानी कारभाराविरोधात गुरुवारी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने पालकवर्ग एकवटला होता. फीवाढविरोधातील फलक तसेच विद्यार्थ्यांसमोरील समस्यांचे फलक घेऊन सेंट जोसेफ स्कूल प्रशासनाच्या विरोधात पालकवर्गाने चौक जिल्हा परिषद शिवसेना विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
सेंट जोसेफ शाळेमध्ये बारावी परीक्षा सुरू असल्याने पालकांचा मोर्चा वाघेश्वरी ढाब्याच्या परिसरात थांबविण्यात आला. सात पालकांच्या कमिटीची शाळेच्या मुख्याध्यापिका क्लारा व त्यांच्या समितीबरोबर चर्चा झाली. या वेळी शाळेने मुख्याध्यापिका क्लारा यांना १० एप्रिलपर्यंत पदावरून हटवू, असे आश्वासन दिले. पालकवर्र्गाला लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. जर १० एप्रिल २०२० पर्यंत पालकवर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांच्या वतीने सुधीर ठोंबरे यांनी दिला आहे.