- संजय करडेमुरुड - ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेवून जंजिरा किल्ल्यावर जात असत; परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्या-येण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती. यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदरात पर्यटकांसाठी वाहन पार्किंग करता यावी, यासाठी मोठे वाहनतळ उभारण्यात आले होते. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या बंदराचा विकास करण्यात आला होता; परंतु ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्याने मात्र वाहनतळाची कामे पूर्ण न केल्याने रखडले आहे.या वाहनतळाला फक्त संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच वाहनतळावर दगडे टाकण्यात आली असून यावर काँक्रीटीकरण होणे आवश्यक असताना ठेकेदाराने हे काम प्रलंबित ठेवल्याने पर्यटकांना या वाहनतळाचा उपयोग करता येत नाही. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते; परंतु हे काम कायमस्वरूपी थांबवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे हे काम पूर्ण होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी येथील स्थानिक नागरिक व पर्यटकांची मागणी आहे.
मुरुडमधील खोरा बंदर येथील वाहनतळाचे काम रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:54 AM