माथेरान : कोरोनाच्या महाभयंकर काळात लॉकडाऊननंतर सात महिन्यांनी २ सप्टेंबर रोजी माथेरान अनलॉक केल्यामुळे इथे आता मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे, परंतु दस्तुरी नाक्यावर असलेल्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क करण्यासाठी येथील वन संरक्षक समितीने पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून पर्यटकांना आपली वाहने बाहेर काढताना काहीच त्रास होणार नाही, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे.सात महिन्यांनंतर इथे पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे नेहमी येणारे, त्याचप्रमाणे नवख्या पर्यटकांनीही माथेरान हे मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ असल्याने सर्वाधिक पसंती दिली आहे. खासकरून मिनीट्रेनच्या सफरीसाठी इथे आवर्जून पर्यटक भेट देत असतात, परंतु पावसाळ्यात चार महिने मिनीट्रेन बंद करण्यात येते आणि अद्याप कुठेही ट्रेन सेवा पुरेशा प्रमाणात सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनाने अथवा स्वत:च्या मोटार गाड्या घेऊन माथेरानमध्ये दाखल होताना दिसत आहेत. दस्तुरी नाक्यावर बहुतांश जागा ही वनखात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे वनसंरक्षक समितीमार्फत केवळ जागेचे पार्किंग भाडे हे खाते आकारते.कुठल्याही प्रकारची वाहनांची जबाबदारी हे खाते स्वीकारत नाही. नव्याने या पार्किंगच्या सुशोभीकरणासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. अनेकदा या पार्किंगमध्ये पर्यटकांना स्वत:च्या मोटार गाड्या पार्क करताना खूपच अडचणी निर्माण होत आहेत. गर्दीच्या वेळी काही नवखे पर्यटक कुठेही आपल्या गाड्या पार्क करत असतात, त्यामुळे एखाद्याच्या गाडीला धक्का लागून नुकसान होण्याची शक्यता असते. मुबलक जागा असतानाही वेळप्रसंगी दाटीवाटीने गाड्या पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे एखाद्याला आपली गाडी बाहेर काढण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत आहे. पार्किंगच्या सुस्थितीत व्यवस्थेसाठी आणि पर्यटकांच्या सुखकर प्रवासासाठी वनसंरक्षक समितीने लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे.माथेरानमध्ये सहकुटुंब स्वत:च्या वाहनाने इथे फिरावयास आलो होतो, परंतु निघतेवेळी आमची गाडी पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी खूपच विलंब लागला होता. तरी निदान संबंधित खात्याने आपल्या कामगार वर्गाला इथे येणाऱ्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी मदत केल्यास काहीही अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.- श्रीकांत सूर्यवंशी, पर्यटक मुंबईपार्किंगच्या वरील भागात आम्ही स्थानिकांच्या जवळपास २५ गाड्या पार्क होऊ शकतात, अशी व्यवस्था केली आहे, तर खालील बाजूस असणाºया बोरीच्या मैदानात तीनशेपेक्षाही अधिक वाहने पार्क होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी कुणाचीही तारांबळ उडू नये, यासाठी पार्किंग जागेत लाइन आखून, त्या जागी व्यवस्थित गाड्या पार्क होऊ शकतात. आमचे कामगारही बारकाईने या ठिकाणी पार्किंगच्या सुस्थितीत व्यवस्थेसाठी तत्पर राहणार आहेत.-योगेश जाधव, अध्यक्ष माथेरान वन संरक्षक समिती
माथेरानमध्ये पर्यटकांना पार्किंगची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:31 PM