किल्ले रायगडच्या पायथ्याशी पार्किंगची समस्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:04 PM2019-12-10T23:04:15+5:302019-12-10T23:04:40+5:30
शैक्षणिक सहली आणि एसटीला अडथळा
दासगाव : महाड जवळील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या अरुंद जागेमुळे गेल्या अनेक वर्षांचा पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. या ठिकाणी पर्यटक वाहनांची पार्किंग करत असल्याने किल्ले रायगडपासून पुढे जाणाऱ्या एसटीला हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे. महाड तालुका पोलीस विभागाचे वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात व्हावेत, अशी मागणी करूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ले रायगडवर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात. शिवराज्याभिषेक, शिवपुण्यतिथी या दोन कार्यक्रमांना गडावर गर्दी होत असते. या दिवशीही रायगडाच्या पायथ्याशी आणि रोप वेपर्यंत वाहनांची गर्दी असते. रायगडाच्या पायथ्याशी पुरेशी जागा नसल्याने वाहन पार्किंगचा प्रश्न बिकट आहे. यामुळे वाहने रस्त्याकडेला पार्क केली जात आहेत. अनेक वेळा वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावली जात आहेत. केवळ लहान कार निघून जाईल, असा रस्ता शिल्लक राहतो. यामुळे मोठी वाहने अडकून पडतात. ही अवस्था जशी उन्हाळ्यात होती, तशीच ऐन पावसाळ्यातही होते. पावसाळ्यात गडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. शनिवार आणि रविवार तर जास्त गर्दी होत आहे.
पावसाळ्यानंतर आता हिवाळा सुरू झाल्याने रायगडावरील आणि परिसरातील थंड वातावरणामुळे गडावर शैक्षणिक सहलीदेखील वाढल्या आहेत. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार गडावर शिवप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणात येणारी वाहने चित्ता दरवाजापासून रायगडवाडी गावाकडे तर चित्ता दरवाजा ते रोप वे फाटा या रस्त्यावर पार्क होत आहेत. या रस्त्याच्या एका बाजूला किल्ले रायगडाचा डोंगर तर दुसºया बाजूला तीव्र उतार आहे. यामुळे वाहने रस्त्याकडेला पार्क करावी लागत आहेत. मात्र, अनेक वेळा ही पार्किंग बेजबाबदारपणे केली जात असल्याने पुढे जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोध
किल्ले रायगडाच्या पुढे रायगडवाडी, छत्री निजामपूर, बावळे, वाघेरी, टकमकवाडी अशा वाड्या आणि गावे येतात. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा या गावांना आहे. रायगडवाडीपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या निजामपूर गावाजवळील रस्ता खराब असल्याने येथील शिंदेकोंडपर्यंत एसटी जाते. मात्र, किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होत असलेल्या वाहतूककोंडीने एसटी पुढे निघून जाणे कठीण होत आहे.
तर दुसरीकडे एसटी रायगड रोप वेकडे जाणाºया हिरकणीवाडी फाट्यापासूनच परत फिरते. यामुळे प्रवासी संतप्त होतात. मात्र, गडावर आलेल्या शिवप्रेमींच्या रायगड प्रेमापोटी ते आपला राग गिळून चालत जाणे पसंत करतात. महाडमध्ये येणारे कॉलेज विद्यार्थी, कोंझर आणि पाचाड येथील विद्यालयीन विद्यार्थ्यांनाही यामुळे अनेक वेळा पायपीट करावी लागते.
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग न करता एकाच बाजूने वाहने पार्किंग केल्यास एसटीसारखी मोठी वाहने सहज निघून जातील आणि पर्यटकांना आणि स्थानिक ग्रामस्थांनाही त्रास होणार नाही.
- अमर सावंत, ग्रामस्थ