जासई उड्डाणपुलाचा भाग कोसळला; उरणजवळील घटनेत एका कामगाराचा मृत्यू; तर सहा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:32 AM2021-11-03T07:32:18+5:302021-11-03T07:32:40+5:30
जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये खर्चून सात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : जेएनपीटीच्या तीन हजार कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या सातपैकी जासई उड्डाणपुलावरील २० क्रमांकाचा पीयर कॅपचा स्लॅब भरताना बूम प्लेअरला क्रेनचा धक्का लागून परात अचानक कोसळली. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली.
या घटनेतील जखमींवर जेएनपीटी व एमजीएम इस्पितळात उपचार सुरु आहेत. पोलिसांना या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
मोहम्मद मुजम्मिल फाजरुंम रहमाल आलम (वय २०) असे मृताचे नाव आहे. तर, जखमींमध्ये अशोक लाल भाऊजी सुरेन (१८), दुलाल रामदास मुरमु (१८), चंदन कुमार मड्या (२०), अमरकांत भोला मंडल (१९), समीर गायन मुरम (२०), नागेन शिबराज मुर्मु (२०), ओम प्रकाश बानू भारद्वाज (४८) यांचा समावेश आहे.
जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये खर्चून सात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. त्यापैकी दास्तान ते शंकर मंदिरदरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या जासई उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या ५० पीयर कॅपपैकी २० क्रमांकाच्या पीयर कॅपचे काम मंगळवारी (२) सुरू होते.
१४ मीटर उंचीवर पीयर कॅपच्या स्लॅब भरण्याच्या कामासाठी परातीही बांधल्या होत्या. त्यावर १०-१५ कामगार काम करत होते.
अचानक परातीला स्लॅब भरणारी बूम प्लेअरचा धक्का लागला. या धक्क्याने परात स्लॅब, स्टील, मलब्यासह खाली कोसळला. या स्लॅब, स्टील, मलब्यात एक कामगार जागीच ठार झाला. तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी जेएनपीटी आणि एमजीएम रुग्णालयात दाखल केल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, एसीपी सचिन सावंत, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
मलबा बाजूला करण्याच्या कामासाठी जेएनपीटी गव्हाणफाटादरम्यान सुमारे दोन तास वाहतूक बंद करण्यात आली होती. उरण तहसीलदारांनी या अपघाताची चौकशीचे आदेश दिले आहेत.
परात कोसळल्याने दुर्घटना
पीयर कॅप भरताना परातीला बूम प्लेअरचा क्रेनचा धक्का लागून स्टील, मलब्यासह खाली परातीसह अचानक कोसळून अपघात झाल्याची माहिती ठेकेदार जे. कुमार कंपनीचे सहायक अभियंता पीराजी कांबळे यांनी दिली.