कर्जत : तालुक्यातील वनजमिनीवर घर करून राहणारे आदिवासी यांना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे, त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानग्यासाठी अडून राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केला. कशेळे येथील प्रचारसभेत पार्थ पवार बोलत होते.कर्जत तालुक्यातील कशेळे येथील हनुमान मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करताना पार्थ पवार यांनी आपल्याला लहान मुलांसाठी केंद्र पातळीवरील शाळा सुरू करायच्या असून आदिवासी भागातील एकही गाव, वाडी वीज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आपल्याला लोकसभेत पाठवावे अशी विनंती केली. पवार यांनी पुढे बोलताना भीमाशंकर घाटरस्त्याचा प्रश्न भाजप सरकारने सोडविला नाही, आजही अनेक आदिवासी वाड्या रस्त्याने जोडल्या नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि अनेक रस्त्यांचे रुंदीकरण हे वनजमिनीचा प्रश्न सोडविला गेला नसल्याने रखडले आहेत ते सोडविण्यासाठी आपल्याला लोकसभेत पोहचायचे आहे. माथेरानसारख्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच माथेरान आणि सह्याद्री या डोंगर रांगांना लागलेला इको सेन्सेटिव्ह झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे आणि काँग्रेस आघाडीने तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघात निर्माण केला आहे. त्याला आपले प्रेम पाहिजे आहे, असे आवाहन पार्थ पवार यांनीकेले.याप्रसंगी शेकापचे नेते विलास थोरवे यांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी पाथरज प्रभाग जास्त मताधिक्य देतो की कळंब प्रभाग यावर स्पर्धा चालली आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून पार्थ पवार यांना मताधिक्य देणार असा विश्वास थोरवे यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश लाड यांनी आम्ही पार्थ पवार यांची उमेदवारी मागून घेतली असून १० वर्षात आम्ही अनेक आदिवासी वाड्यांना वीज पुरवठा पोहोचविला आहे, विद्यमान खासदारांनी तुंगीमध्ये लाइट कोणत्या शिवसेना नेत्यांसाठी नेली हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन केले.
वनजमिनीसंबंधी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार - पार्थ पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:57 PM