वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावणार : पार्थ पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:59 PM2019-04-12T23:59:11+5:302019-04-12T23:59:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारफेरीचे आयोजन केले होते.
नेरळ : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू करणे, वन जमिनीचे प्रश्न मार्गी लावणे हे आपले उद्दिष्ट असून पिकांना योग्य बाजारभाव मिळवून दिला जाईल असे आमचे प्रयत्न आहेत. शेतकरी, कामगार यांना सर्वांना घेऊन महाआघाडी निर्माण झाली आहे. आघाडीच्या हाती सत्ता देऊन देशाला पुन्हा जगाच्या नकाशावर न्यायचे आहे, असे आवाहन पार्थ पवार यांनी नेरळ येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारफेरीचे आयोजन केले होते. नेरळ गावातील शिवाजी महाराज चौकात जाऊन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकरी भवनमध्ये आयोजित केलेल्या संवाद सभेला उपस्थिती लावली. पार्थ पवार यांनी, आपण मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी पाच प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. त्यात पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू करणे, वन जमिनीचे प्रश्न मार्गी लावणे हे आपले उद्दिष्ट असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळवून देणे आणि खालच्या भागातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात नियोजन मंडळ अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न राहतील असे जाहीर केले.