- वैभव गायकर पनवेल : पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच त्यांनी पनवेल आणि उरणमधील गाठीभेटींवर भर देण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांना सोबत त्यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या शेकापच्या नेत्यांनाही सोबत घेतल्याने प्रचारात खऱ्या अर्थाने ‘आघाडी’चे चित्र दिसू लागले आहे.मावळच्या राजकारणावर यापूर्वी दिसत नव्हता, एवढा प्रभाव सध्या रायगडच्या राजकारणाचा दिसतो आहे. जरी जिल्हयातील पनवेल, उरण हे दोनच मतदारसंघ त्या लोकसभेत मोडत असले, तरी त्याचे राजकीय महत्त्व गृहीत धरून पक्षाच्या हालचाली सुरू आहेत.सध्या पनवेल विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे, तर उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी या दोन्ही मतदारसंघांतून शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघातून विजय मिळविला. श्रीरंग बारणे हे मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. युतीमुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शरद पवार यांनी नातवासाठी ही जागा निवडल्याचा आणि त्यासाठी स्वत: निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचा परिणाम येथील राजकीय घडामोडींवर स्पष्टपणे जाणवतो. पनवेलमधील शेकापची ताकद लक्षात घेता, सर्वप्रथम पार्थ यांनी शेकापचे आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेससह, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही यात सहभाग होता. नंतर उरणमधील पदाधिकाºयाचीही त्यांनी भेट घेतली.
शेकापच्या सहकार्याने पार्थ यांच्या गाठीभेटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:39 AM