शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हावे- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:09 AM2020-12-08T02:09:24+5:302020-12-08T02:09:56+5:30
Raigad News : शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे.
अलिबाग - केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या पाच फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्याच्या या ‘भारत बंद’ला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभातील शेतकऱ्याचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत अक्षम्य अनास्था दाखवित आहे. सरकारच्या आठमुठ्या धोरणांमुळे शेतकरी शिष्टमंडळासोबतच्या आतापर्यंत सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत.
आंदोलनकारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या हाकेला देशभरातील जनतेने प्रतिसाद देऊन हा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करावा, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे.