अलिबाग बसस्थानकावर मोकाट श्वानांची प्रवाशांनी घेतली धास्ती
By निखिल म्हात्रे | Published: June 16, 2024 12:50 PM2024-06-16T12:50:39+5:302024-06-16T12:51:02+5:30
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे सर्व शासकीय व खासगी महत्त्वाची कार्यालये आहेत.
अलिबाग : एसटी बस आगारातील स्थानकात मोकाट श्वानांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकात जीव मुठीत घेऊन थांबावे लागत आहे. कधी श्वान अंगावर येतील याचा नेम नाही.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे सर्व शासकीय व खासगी महत्त्वाची कार्यालये आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी अलिबाग, वरसोली येथील समुद्रकिनारे, कुलाबा किल्ला पर्यटकांच्या पसंतीस असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ अधिक आहे, तसेच नोकरी व्यवसायानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी बस आगार आहे. दिवसाला हजारो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. अलिबागहून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह वेगवेगळ्या जिल्ह्यात एसटी सेवा दिली जाते. आठवड्याचे सातही दिवस येथे प्रवाशांची गर्दी असते. प्रतीक्षालय कक्षासमोर श्वानांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.