शिवशाहीबाबत प्रवाशांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:16 AM2018-06-29T03:16:42+5:302018-06-29T03:16:45+5:30
शिवशाही एसटी बसेस रायगड एसटी विभागात सुरू झाल्यापासून, शिवशाही एसटी बसचा जिल्ह्यातील पाचवा अपघात असल्याची माहिती रायगड(रामवाडी) एसटी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली
जयंत धुळप
अलिबाग : शिवशाही एसटी बसेस रायगड एसटी विभागात सुरू झाल्यापासून, शिवशाही एसटी बसचा जिल्ह्यातील पाचवा अपघात असल्याची माहिती रायगड(रामवाडी) एसटी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे. दरम्यान, शिवशाही एसटी बसेसच्या बाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. मुळात या शिवशाही एसटी बसेसवरील चालक हे प्रसन्न ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीचे चालक असल्याने, त्यांचा त्याच बसवरील एसटी महामंडळाच्या वाहकाबरोबर अपेक्षित समन्वय नसतो, त्याचा विपरीत परिणाम प्रवाशांना भोगावा लागतो आहे. गुरूवारी घडलेल्या अपघातामुळे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
गुरूवारी सकाळी अलिबागपासून सहा किमी अंतरावरील कार्लेखिंड घाटात अत्यंत वेगातील मुरुड-स्वारगेट या शिवशाही बसने तिच्या पुढे जाणाऱ्या मिनीडोर रिक्षाला धोकादायक परिस्थितीत ओव्हरटेक केले. तसेच समोरून येणाºया पनवेल-अलिबाग एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात या तीनही वाहनांतील एकूण ८७ प्रवासी जखमी झाले. यामध्ये ४४ पुरुष तर ४३ स्त्री प्रवासी आणि एका समावेश आहे. या सर्व जखमी प्रवाशांना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पनवेल-अलिबाग एसटी बसचे चालक के.एस.लहाने या अपघातात गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
कार्लेखिंड घाटात मुरुड येथून स्वारगेट(पुणे) येथे जाणारी शिवशाही बस क्र.एम.एच.१४-जीडी-८७३९ हिने त्यापुढे जाणाºया मिनीडोर रिक्षा क्र. एम.एच.०६-जे-२८९८ हिस भरधाव वेगात ओव्हरटेक करीत असताना, समोरून येणाºया पनवेल-अलिबाग एसटी बस क्र.एम.एच.-१४-बीटी-१८७७ हिस समोरूनच जोरदार धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला.
या अपघातास कारण ठरलेला शिवशाही एसटी बसवरील प्रसन्न ट्रॅव्हल्स कंपनीचा खासगी चालक सय्यद तोहर निजाम याच्याविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवशाही एसटी बसचे चालक बसेस बेदरकारपणे चालवितात. याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नाही, अशी तक्रार प्रवासी बाळाराम पाटील यांनी केली आहे. शिवशाही एसटी बसमध्ये उभ्याने प्रवास करणे अपेक्षित नाही तरी सुद्धा अतिरिक्त प्रवासी घेवून त्यांना उभ्याने प्रवास करण्यास भाग पाडले जाते, याबाबत आरक्षणासह बसून प्रवास करणाºया प्रवाशांनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे सविता देशमाने या महिला प्रवाशाने सांगितले. एकंदरीत घटना पाहता शिवशाही बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे.