मोहोपाडा : येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पराडे ते सिध्देश्वरी रस्त्यावरील पाताळगंगा पुलाच्या रस्त्याचा भाग खचला असून याठिकाणी वाहनास अडथळा निर्माण होत आहे. या पुलाला जागोजागी खड्डे पडून काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स व शिगा बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. मागील वर्षात या पुलाचा काही भाग खचून ट्रक पाताळगंगा नदीत कोसळला होता. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे दांड रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरून दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. या पुलाला पर्याय म्हणून बाजूलाच नवीन पुलाचे बांधकाम गेल्या दीड वर्ष सुरू असून ते अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांत नाराजी दिसून येत आहे. सध्या रहदारीसाठी जुन्याच पुलाचा वापर होत असून एखादे मोठे वाहन येथून गेल्यास पूल हादरत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (वार्ताहर)
पाताळगंगा पूल धोकादायक
By admin | Published: November 14, 2015 2:19 AM