सकारात्मकतेमुळेच पतसंस्थेची भरभराट; जिल्ह्यातील पतसंस्था संचालक, कर्मचा-यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:55 AM2017-09-24T01:55:52+5:302017-09-24T01:55:57+5:30
सहकार ही विश्वासावर चालणारी चळवळ आहे. जीएसटीचा फटका देशभरातील पतसंस्थांना बसलाय. सकारात्मक धोरण, कायदा, परिपत्रक आणि निर्णयांचा आदर केल्यास पतसंस्था कधीच अडचणीत येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
अलिबाग : सहकार ही विश्वासावर चालणारी चळवळ आहे. जीएसटीचा फटका देशभरातील पतसंस्थांना बसलाय. सकारात्मक धोरण, कायदा, परिपत्रक आणि निर्णयांचा आदर केल्यास पतसंस्था कधीच अडचणीत येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ आणि सहकार भरती सहकारी प्रशिक्षण सहकारी संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे जिल्ह्यातील पतसंस्था संचालक आणि कर्मचारी यांच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शेखर चरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडका, सहकार भरतीचे अखिल भारतीय महासचिव प्रा. डॉ. उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक सुरेश पाटील, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, धुळे येथील चार्टर्ड अकाउंटंड श्रीराम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चरेगावकर म्हणाले, पतसंस्थांची सद्यस्थिती संक्र मणावस्थेत असल्याचा डंका सहकार चळवळीतील पदाधिकारीच पिटत आहेत. सरकारच्या धोरणामुळे आणि नव्या कायद्यामुळे संस्थाचालक घाबरले आहेत. संस्थाचालकांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. सकारात्मक मानसिकता ठेवून कायद्यानुसार अर्थ व्यवहार करायला हवे, तरच पतसंस्था प्रगतीकडे नेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
सहकार चळवळ ही लोकांनी लोकांसाठी चालविलेली चळवळ आहे. कायदे नसताना चळवळ अस्तित्वात आली आणि आता यापुढे कितीही कायदे आले तरी सहकार चळवळ मागे पडणार नाही. नव्या सहकार कायद्यानुसार चुकीचे काम करणारेच अडचणीत येतात, यासाठी कायदा, परिपत्रक आणि निर्णयाचा आदर करायला संस्था चालविणाºयांनी शिकायला हवे. आजच्या नव्या कायद्याच्या सरोवरात पतसंस्थांना तारण्यासाठी मानसिकता बदलून योग्य सल्ल्यानुसार पोहायला शिकायला हवे, असे शेखर चरेगावकर म्हणाले.
लाखोंना रोजगार आणि कुटुंबे पोसण्याची ऊर्जा पतसंस्थांनी दिली
सहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या पतसंस्था या उपजीविकेचे साधन बनल्या आहेत. लाखोंना रोजगार आणि कुटुंबे पोसण्याची ऊर्जा पतसंस्थांनी दिली आहे. हे उपजीविकेचे साधन अधिक सक्षम बनविण्यासाठी सहकार चळवळीत काम करणाºयांनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्ला चरेगावकर यांनी अखेरीस दिला.
विविध सत्रांत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
कार्यक्र माच्या प्रास्ताविकात रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील यांनी जिल्ह्यातील पतसंस्था आणि सहकार चळवळीचा आढावा घेतला, तर सूत्रसंचालन योगेश मगर यांनी केले. जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांचे संचालक, चेअरमन, कर्मचारी या प्रशिक्षण वर्गास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. विविध सत्रांत तज्ज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी दिली.