सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:54 PM2018-10-14T22:54:25+5:302018-10-14T22:56:42+5:30

जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Patients admits without water in government hospital | सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंतररुग्ण विभागामधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विविध वार्डमधील स्वच्छतागृहांमधील नळाला पाणी नसल्याने तेथे पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात येतात. मात्र, त्यामध्येही पुरेसे पाणी नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे, यामध्ये सर्वाधिक हाल महिला प्रसूती विभागातील रुग्णांचे होत आहेत.


स्वच्छतागृहात पाणी नसल्याने अन्य आजार बळावण्याची शक्यताही निर्माण झाली आहे, यामध्ये रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. येथे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कर्जत ते पोलादपूरपासून रुग्ण मोठ्या संख्येने रोज येत असतात.


सरकारी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावे लागतात; परंतु सरकार आणि प्रशासन आवश्यक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते. या रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण येत असल्याने विविध समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.


जिल्हा सरकारी रुग्णालयाची क्षमताही २७६ खाटांची आहे, तर अतिदक्षता विभागात सहा खाटा आहेत. २७६ खाटांपैकी महिला प्रसूती विभागात ४२ ची व्यवस्था आहे. महिला प्रसूती वार्डमधील रुग्णांची संख्या नेहमीच तुलनेने जास्त असते.


सध्या रुग्णालयामध्ये तापांच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे. २७६ पैकी सुमारे २५५ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत, याचा अर्थ २५५ रुग्ण अधिक. त्यांचे किमान दोन नातेवाईक असे मिळून तब्बल ५१० जणांचा भार या रुग्णालय व्यवस्थेवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र पाणी पुरवठ्याअभावी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.


रुग्णालयामध्ये कोणतीही असुविधा होणार नाही, याची काळजी रुग्णालय प्रशासनामार्फत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी अलिबाग नगरपालिकेने पाणीपुरवठा करणाºया पाइपचे काम हाती घेतले होते, त्यामुळे पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. आता व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे.
- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक



पाण्याअभावी आजार बळावणार

  • पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील प्रत्येक वार्डमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांना अधूनमधून पुरेशा प्रमाणात पाणीच नसते, त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच गैरसोय होते.
  • नळाला पाणी आले नाही, तर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी तेथेच पाणी साठवून ठेवण्यात येते; परंतु कधी कधी त्यामधील पाण्याचा साठा संपलेला असतो, याबाबत रुग्णाचे नातेवाईक तक्रार करतात, तेव्हा नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण पुढे केले जाते.
  • स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे, हे फारच गंभीर आहे. कारण रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णालयात येतात. मात्र, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने तेथे अस्वच्छताच असणार त्यामुळे अन्य आजार बळावण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Patients admits without water in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.